मुक्तपीठ टीम
भारतीय सेनादलाने गायीच्या दुधांसाठी असलेले गोठे बुधवारपासून बंद केले आहेत. आता सेनादलाला आवश्यक दूध पुरवठा खुल्या बाजारातून शक्य असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे गोठे, गवत यासाठी राखून ठेवलेली मोठी जमीन आणि मनुष्यबळ आता इतर कामांसाठी वापरणे शक्य होणार आहे. त्याचवेळी सेनादलाचे तळ असलेल्या भागांमधील शेतकऱ्यांना त्यांच्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून दूध पुरवठ्याचे मोठे काम मिळण्याची संधीही उपलब्ध होऊ शकेल. अर्थात ते सरकारच्या निर्णयावर अवलंबून असेल.
ब्रिटीशांच्या काळात विविध ठिकाणी तैनात असलेल्या सैन्याच्या जवानांना ताजे आणि शुध्द दूध मिळावे, यासाठी लष्कराने देशभर स्वतःच्या मालकीचे गाई-गुरांचे गोठे स्थापन केले होते. अलाहाबाद येथे १ फेब्रुवारी १८८९ रोजी पहिला गोठा सुरु करण्यात आला. स्वातंत्र्यानंतर लष्कराने देशभरात १३० गोठे स्थापन केले होते, ज्यात ३० हजार जनावरे होती. १९९० साली लेह आणि लद्दाख येथेही असे गोठे तयार करण्यात आले होते, जेणेकरून जवानांना त्यांच्या लष्करी तळांवर दररोज स्वच्छ आणि ताजे दूध मिळू शकेल. या गोठ्यांच्या व्यवस्थापनासह, लष्करातील कर्मचाऱ्यांना आपल्या जमिनीच्या मोठमोठ्या पट्ट्यांची देखभाल करुन तिथल्या गवताच्या पेंढ्याचीही व्यवस्था बघण्याचे आणि या पेंढ्या गोठे सांभाळणाऱ्या विभागांकडे पाठवण्याचेही काम होते.
जवळपास एक शतकभर, लष्कराच्या या गोठ्यांतून दरवर्षी साडे तीन कोटी लिटर दूध आणि २५ हजार मेट्रिक टन पेंढ्याचा पुरवठा सातत्याने सुरु होता. तसेच या गोठ्यांमध्येच भारतात पहिल्यांदा जनावरांचे कृत्रिम रेतन करण्याचा यशस्वी प्रयोग झाला. १९७१च्या युद्धात,कारगिल युद्धाच्या वेळी पूर्व आणि पश्चिम सीमेवर लढणाऱ्या जवानांना याच गोठ्यांमधून ताज्या दुधाचा पुरवठा केला गेला. कृषी मंत्रालयाशी समन्वय साधत, या विभागाने, ‘प्रोजेक्ट फ्रेजवाल’ हा दुभत्या जनावरांचा जगातील सर्वात मोठा मिश्र संकराचा कार्यक्रम देखील राबवला होता. तसेच डीआरडीओच्या जैव-इंधन बनवण्याच्या प्रकल्पात देखील या विभागाने मदत केली होती.
तब्बल १३२ वर्षे देशाची अखंडित अविरत सेवा केल्यानंतर आता या विभागाची सेवा समाप्त होत आहे. या विभागात काम करणारे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्याना लष्कराच्या इतर विभागांमध्ये समायोजित करण्यात आले आहे. त्याचवेळी जर सेनादलांसाठी दूध पुरवठ्याची संधी त्या-त्या विभागातील शेतकरी संस्थांना मिळाली, तर ही खरंच मोठी चांगली बातमी ठरु शकेल.
पाहा व्हिडीओ: