अपेक्षा सकपाळ / मुक्तपीठ टीम
हेमा ते लता ते स्वरलता, गानकोकिळा, गानसम्राज्ञी लता मंगेशकर हा दीदींचा प्रवास अलौकिक आणि तितकाच थक्क करणारा आहे. यशाच्या उंच शिखरावर पोहोचलेल्या लता दीदींनी आयुष्यात अनेक चढउतारांचा सामना केला. लतादीदींनी आपल्या गायनातून, आवाजातून पुढच्या संगीत विश्वातल्या पिढ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या जाण्याने आपण पोरकं झाल्याची भावना प्रत्येक भारतीयाच्याच नाही तर जगभरातील कोट्यवधी संगीतरसिकांच्या मनात निर्माण झाली आहे. मात्र, त्यांचा जो आवाज अजरामर ठरला आहे, तोच त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला नाकारला गेला होता. एका दिग्दर्शकानं त्यांचा आवाज पातळ असल्याचं सांगत त्याच्या चित्रपटात गाण्यासाठी नाकारला. त्यावेळी त्यावेळी त्यांची शिफारस करणाऱ्या गुलाम हैदर यांना संताप आला. ते म्हणाले की, “भविष्यात प्रत्येक संगीतकार लतादीदींनीच गाणं गावं यासाठी झुरतील.” पुढे झालंही तसंच.
२८सप्टेंबर १९२९ मध्ये मध्य प्रदेशातल्या इंदूरमध्ये पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात लतादीदींचा जन्म झाला. वडिल संगीत क्षेत्राशी जुळलेले असल्याने संगीताचा वारसा दीदींना घरातच मिळाला. पाच वर्षांच्या असल्यापासून लतादीदी वडिलांसोबत नाटकात अभिनय करु लागल्या. सोबतच संगीताचे धडेही गिरवू लागल्या. प्रसिद्ध उस्ताद अमानत अली खाँ साहेब यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडेही गिरवू लागल्या. मात्र फाळणीच्यावेळी खाँसाहेब पाकिस्तानात निघून गेले. पुढे पंडित तुळशीदास शर्मा आणि उस्ताद बडे गुलाम अली खाँ यांच्याकडूनही त्यांनी संगीताचे धडे गिरवले.
१९४० च्या दशकात ज्यावेळी दीदींनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला त्यावेळी नूरजहां, शमशाद बेगम आणि जोहरा बाई अंबाले यांच्यासारख्या दमदार गायिकांचा दबदबा होता. त्यावेळी शशिधर मुखर्जी यांनी लतादीदींना संधी देण्यास नाकारली.
प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक गुलाम हैदर यांनी लता मंगेशकर यांची ओळख प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक शशधर मुखर्जी यांच्याशी करून दिली होती. शशधर यांनी लता दीदींचा आवाज ऐकला आणि सांगितले की “तिचा आवाज खूप पातळ आहे आणि तो तिला आपल्या चित्रपटात गाणे गायला देवू शकत नाहीत.” हे ऐकून गुलाम हैदर संतापले आणि म्हणाले की, “भविष्यात प्रत्येक संगीतकार लतादीदींनीच गाणं गावं यासाठी झुरतील.” पुढे झालंही तसंच.
१९४२ मध्ये अवघ्या १३ वर्षांची असताना पंडित दिनानाथ मंगेशकरांचं निधन झालं आणि कुटुंबाची जबाबदारी लतादीदींवर आली. १९४२ मध्ये पहिल्यांदा मंगळागौर या मराठी सिनेमात त्यांनी अभिनय केला. त्यानंतर १९४८ पर्यंत ८ हिंदी आणि मराठी सिनेमात त्यांनी काम केलं.
१९४८ मध्ये त्यांना गुलाम हैदर यांच्यासोबत मजबूर या सिनेमात मोठा ब्रेक मिळाला. त्यानंतर १९४९ मध्ये ‘बरसात’, ‘दुलारी’, ‘महल’ आणि ‘अंदाज’ सिनेमा प्रदर्शित होऊन हिट ठरले. त्यांच्या गाण्यांना लोकप्रियता मिळाली. त्यानंतर दीदींनी मागे वळून पाहिलं नाही.
३० हजाराहून अधिक गाणी केली स्वरबद्ध
लतादीदींनी ३६ भाषांमध्ये ३० हजार गाणी गायली. त्यांनी शंकर जयकिशन, मदन मोहन, जयदेव, लक्ष्मीकांत प्यारेलाल, एस डी बर्मन, नौशाद आणि आर डी बर्मन यांच्यापासून रहमान यांच्यापर्यंत प्रत्येक पिढीच्या संगीतकारांसोबत काम केलं आहे.