मुक्तपीठ टीम
ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आज भाजपचा राज्यभरात एल्गार पुकारला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. आज त्या मागणीसाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे असे सर्व मोठे नेते रस्त्यावर उतरल्याने भाजपाची ओबीसी मतदारांना पुन्हा पक्षाशी जोडण्याची रणनीती स्पष्ट होत आहे. त्याचा भाजपाला नेमका किती फायदा होतो ते आगामी निवडणुकांमध्येच स्पष्ट होईल.
आज राज्यभरात भाजप नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, सातारा, कोल्हापूर, या आणि अन्य ठिकाणी ओबीसी आरक्षण परत मिळावं, यासाठी भाजपने आक्रमक आंदोलन पुकारले केला. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातल्या विविध ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले आहे.
भाजपा सत्ताकाळात ओबीसी दुरावले
मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस असताना मुख्यमंत्रीपदाचे इच्छूक मानले जाणाऱ्या एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांच्यासारख्या प्रभावशाली ओबीसी नेत्यांचे पंख छाटले गेल्याचे मानले जाते. त्याच निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळेंसारख्या नेत्यांना उमेदवारीही नाकारण्यात आली. त्यातून भाजपाचे नुकसानच झाल्याचे मानले जाते. त्याच निवडणुकीत पंकजा स्वत: पराभूत झाल्या, तर एकनाथ खडसेंनी आपला मुक्ताईनगर मतदारसंघ गमावला. बावनकुळेंना उमेदवारी नाकारली गेल्यामुळे विदर्भात भाजपाला फटका बसल्याचे मानले जाते.
ओबीसींना आक्रमकतेतून आकर्षित करण्याचा प्रयत्न
त्यामुळे पुन्हा एकदा ओबीसी मतदारांना भाजपाकडे आणण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरु होते. धनगर आरक्षणासारख्या मुद्यावर भाजपा आक्रमक राहिली. आता ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होताच संपूर्ण बळ लावत रस्त्यावर आक्रमक होण्यामागे तीच रणनीती असल्याचे मानले जाते. आघाडीत छगन भुजबळ, एकनाथ खडसे, नाना पटोले, विजय वड्डेटीवार यांच्यासारखे मोठे ओबीसी नेते असले तरी ते सत्तेत असल्याने त्यांना काही मर्यादा आहेत. त्याचा फायदा घेत जास्त आक्रमक होत बाजी मारण्याचा भाजपाचा प्रयत्न दिसत आहे.