मुक्तपीठ टीम
संरक्षण दलातील २३ लाखांहून अधिक संरक्षण दलाच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी एक चांगली बातमी आहे. आता माजी सैनिक, अधिकाऱ्यांना डिजी लॉकरच्या माध्यमातून त्यांची पेन्शन पेमेंट ऑर्डर त्वरित मिळवता येणं शक्य होणार आहे. त्यामुळे आता जगभरात कुठूनही त्यांच्या ईपीपीओची प्रत मिळवता येईल.
संरक्षण मंत्रालयाच्या माजी सैनिक कल्याण विभागाने संरक्षण क्षेत्रातील निवृत्तीवेतनधारकांचे ‘जीवनमान उंचावण्यासाठी प्रिन्सिपल कंट्रोलर ऑफ डिफेन्स अकाऊंट्स (पीसीडीए) पेन्शन, अलाहाबादने तयार केलेल्या इलेक्ट्रॉनिक पेन्शन पेमेंट ऑर्डरचे (ईपीपीओ) डिजी लॉकरसह एकत्रीकरण केले आहे.
यामुळे संरक्षण दलातील सर्व निवृत्तीवेतनधारकांना डिजी लॉकरकडून ईपीपीओची नवीन प्रत त्वरित मिळवता येईल. याद्वारे डिजी लॉकरमध्ये पीपीओची कायमस्वरूपी नोंद केली जाईल आणि त्याचबरोबर नवीन पेन्शनधारकांपर्यंत पीपीओ पोहचण्यास आणि प्रत्यक्ष प्रत देण्यास होणारा विलंब दूर होईल.
त्यानुसार, पीसीडीए (पेन्शन), अलाहाबादची डिजी लॉकर मंचाद्वारे संरक्षण क्षेत्रातील २३ लाखांहून अधिक निवृत्तीवेतनधारकांचे ईपीपीओ प्रदान करण्यासाठी सेवा प्रदाता म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. यामुळे त्यांना जगभरात कुठूनही त्यांच्या ईपीपीओची प्रत मिळवता येईल.