मुक्तपीठ टीम
गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेल्या दोन वर्षापासून भारत नेट प्रकल्पांतर्गत ग्रामपातळीपर्यंत इंटरनेट सुविधा पोहोचवण्याचे काम सुरू आहे. सध्या पहिल्या टप्प्यात या जिल्ह्यातील बारा तालुक्यांपैकी सहा तालुक्यांमध्ये हा प्रकल्प सुरू आहे. सीएससी व बीबीएनएल या कंपनीकडून या प्रकल्पा अंतर्गत ग्रामपंचायतची जोडणी पूर्ण झालेली आहे. हे सहा तालुके म्हणजे कुरखेडा, वडसा, आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी आणि मुलचेरा अशी नावे आहेत. जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी सांगितले आहे की, गरजूंना इंटरनेटची जोडणी कमी दरात देण्यात येईल. या सहा तालुक्यात अनेक गावे आहेत जिथे इंटरनेट सुविधा पोहोचविण्यात आली आहे. त्यामुळे आता गावकऱ्यांना नाममात्र दरात वायफाय सुविधा मिळून जगाच्या स्पर्धेत उतरता येईल.
या सहा तालुक्यांचा इंटरनेट जोडणीमध्ये पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आलेला आहे. सध्या गावातील प्रत्येकी पाच शासकीय कार्यालयांना इंटरनेट जोडणीचे काम सुरू आहे. सीएससीला जिल्हाधिकाऱ्यांकडून निर्देशही देण्यात आले होते की, या जोडणीमध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा जोडणीला प्राधान्य द्यावे. ग्रामपंचायतपर्यंतची मुख्य जोडणी ही १०० टक्के पूर्ण करण्यात आली आहे. आता इतरही तालुक्यांमधील गावे इंटरनेटने जोडण्याचे काम सुरू आहे. हा इंटरनेट जोडणीचा उपक्रम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
नागरिकांसाठी एका गावात कोणत्याही ठिकाणाहून नाममात्र दरात वाय-फाय पुरवठा केला जाणार आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना चांगल्याप्रकारे फायदा होईल. त्यांनी आरमोरी तालुक्यात या इंटरनेट सुविधेकरिता सीएससी वाय-फाय चौपाल कार्यक्रमांतर्गत सीएससी केंद्र संचालक पराग हजारे यांच्या केंद्रात प्रस्थापित केलेल्या मिनी ओईलटीचीसुद्धा पाहणी केली.
पाहा व्हिडीओ: