मुक्तपीठ टीम
भारत सरकारने लागू केलेल्या नव्या आयटी नियमांचे वेळेत पालन न करणे ट्विटरला महाग पडू लागले आहे. ट्विटरने एका अधिकाऱ्याची वेळेत नेमणूक न केल्यानंतर सरकारने त्यांचा थर्ड पार्टी ऑपरेटरचा दर्जा काढून घेतला. त्यामुळे आता ट्विटरवरील प्रत्येक कन्टेन्टसाठी प्रकाशकांप्रमाणेच ट्विटर जबाबदार असणार आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका वृद्धाला मारहाणीचा व्हिडीओ धार्मिक वादातून असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. प्रत्यक्षात तसे नसल्याचा दावा करत पोलिसांनी सात दिवसांच्या आत पोलीस ठाण्यात जबानी नोंदवण्यासाठी येण्याची नोटीस ट्विटरच्या एम.डीं.ना बजावली आहे.
ट्विटरला नोटीसचे प्रकरण आहे तरी काय?
• गाझियाबादमधील लोनी येथे एका वृद्ध व्यक्तीला मारहाण करून त्यांची दाढी कापण्याच्या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.
• त्या प्रकरणी धार्मिक वादातून वृद्धाला मारहाणीचा दावा करणारे ट्विट करण्यात आले होते.
• पुढे तपासात मारहाण झालेला वृद्ध आणि मारहाण करणारे आरोपी मुस्लिमच असल्याचे पुढे आले.
• त्यामुळे मारहाणीमागे धार्मिक हेतू असल्याचे ट्विट चुकीचे ठरल्याचा दावा करण्यात आला.
• त्या व्हिडीओमुळे पोलिसांनी ट्विटर इंडियाचे एमडी मनीष माहेश्वरी यांना नोटीस पाठविली आहे.
पोलिसांच्या नोटीसमध्ये काय आहे?
• ही नोटीस सीआरपीसीच्या कलम १६० अन्वये ट्विटर इंडियाचे प्रमुख मनीष माहेश्वरी यांना लोनी सीमा पोलीस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्यांनी पाठविली आहे.
• नोटीसमध्ये पोलिसांनी म्हटले आहे की, ट्विटरने समाजात द्वेष पसरविणाऱ्या या व्हिडीओची कोणतीही दखल घेतली नाही.
• समाजावर वाईट परिणाम करणारे कार्य आणि कन्टेन्ट यांना प्रोत्साहन दिले.
• ट्विटरने व्हिडीओ व्हायरल होण्यास परवानगी दिली.
• त्या नोटीसनुसार पुढील सात दिवसांच्या आत पोलीस ठाण्यात त्यांची जबानी नोंदवावी लागेल.
• ही नोटीस तपास अधिकाऱ्यांनी जारी केली आहे.
• ट्विटरच्या मुंबई येथील कार्यालयाच्या पत्त्यावर ही नोटीस पाठविण्यात आली आहे.