मुक्तपीठ टीम
नागपूर शहरांमध्ये वैद्यकीय सुविधा या मोठ्या प्रमाणात असून विदर्भाबरोबरच छत्तिसगड आणि मध्यप्रदेश या शेजारील राज्यांमधूनही रुग्ण उपचारासाठी येतात. खासगी रुग्णालयातील सुविधा सुद्धा अधिक गुंतवणूक आणि नव्या तंत्रज्ञानाव्दारे वाढल्या पाहिजेत, अशी सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केली आहे. यामुळे नागपूर एक मेडीकल हब म्हणून विकसित होईल. त्यासाठी वैद्यकीय संस्थांना जमीन आणि अन्य सहाय्य करण्याची घोषणाही त्यांनी केली.
नागपूरमध्ये एमजीएम हेल्थकेअरच्या मार्फत राबविल्या जाणाऱ्या ‘ऍडव्हान्स हार्ट फेल्युअर क्लीनिक आणि हार्ट ट्रान्सप्लांट प्रोग्राम’ च्या लोकार्पणप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी एमजीएम हेल्थकेअर च्या कार्डिएक सायन्स विभागाचे अध्यक्ष डॉ.बालकृष्णन उपस्थित होते. नागपूरच्या सुभाष नगर येथील नाईक लेआउट स्थित असणाऱ्या या हॉस्पिटलमध्ये हृदय प्रत्यारोपण तसेच हृदय रोगासंदर्भातील सुविधा उपलब्ध होणार आहेत. विवेका हॉस्पिटलने एक हजार रुग्णखाटा क्षमतेची सुविधा निर्माण करावी यासाठी त्यांना पर्यायी जमीन देण्याचे सुद्धा आश्वासन गडकरी यांनी यावेळी दिले.
Launching Advanced Heart Failure Clinic & Heart Transplant Programme by Viveka Hospitals, Nagpur https://t.co/qe1vxPlwZ8
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) August 28, 2021
“कोरोना संकट काळामध्ये डॉक्टरांनी देवदूता प्रमाणे काम केले असून अनेक लोकांचे जीव वाचवले. खाजगी क्षेत्रामधून जर वैद्यकीय क्षेत्रात गुतवणूक झाली तर 15 एम्स आणि 500 वैद्यकीय महाविद्यालय देशात स्थापन केली जाऊ शकतात,” असंही त्यांनी यावेळी सांगितले. ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रामध्ये वैद्यकीय सुविधा यांच विकेंद्रीकरण होणे गरजेचे आहे. वैद्यकीय उपकरणांची किंमत सुद्धा कमी व्हावी याकरिता विशाखापट्टणम येथे मेडिकल इक्विपमेंट डिवाइस पार्कची उभारणी करण्यात येत आहे अशी माहिती त्यांनी दिली.
विवेका हॉस्पिटलमध्ये हृदय प्रत्यारोपण आणि इतर हृदयरोगाचा संदर्भातील सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी या हॉस्पिटलच्या प्रशासनाचे सुद्धा आभार मानले. या कार्यक्रमाप्रसंगी एमजीएम हेल्थकेअर ‘विवेका हॉस्पिटल येथील डॉक्टर्स, अधिकारी उपस्थित होते.