मुक्तपीठ टीम
कोरोनाचा काळ अनेकांसाठी सारं जीवनच बदलवून टाकणारा संकट काळ ठरत आहे. संकट एवढं मोठं आहे की सरकारी यंत्रणेवरचा भारही प्रचंड वाढला आहे. त्यात करायची म्हणून टीका करणारे खूप सामाजिक राजकीय कार्यकर्ते सभोताली दिसतात. पण पालघर जिल्ह्यातील एक सामाजिक संस्था अशीही आहे, जिने समाजासाठी आपली संपूर्ण इमारतच नाही तर सर्व सोयीसुविधा खुल्या केल्या आहेत. त्यामुळे पालघरमधील कोरोना रुग्णांच्या उपचाराची चांगली सोय करणे सरकारला शक्य झाले आहे.
पालघर जिल्ह्यात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून अनेक रुग्णांना बेड न मिळाल्याने जिल्ह्याबाहेर देखील उपचारासाठी जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर झडपोलीमध्ये कोरोना केअर सेंटरचे नुकतेच लोकार्पन करण्यात आले आहे. या कोरोना सेंटरचे वैशिष्ट्य म्हणजे ते सरकार चालवत असले तरी त्याची संपूर्ण व्यवस्था जिजाऊ शैक्षणिकव सामाजिक संस्थेने करून दिली आहे. जिजाऊचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या पुढाकारामुळे १०० खाटांचे कोरोना सेंटर नागरिकांसाठी तत्काळ उपलब्ध करून दिले आहेत. अप्पर जिल्हाधिकारी दिलीप गुट्टे आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा भावनादेवी सांबरे यांच्या हस्ते त्याचे नुकतेच लोकार्पण झाले.
“या कोरोना काळात पालघरमधील लोकांना तत्काळ आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्या, तसेच रुग्णांची गैससोय होऊ नये, यासाठी जिजाऊ संस्थेने त्यांच्या सीबीएससी शाळेची ६० खोल्यांची इमारत शासनाला उपलब्ध करून दिली. तेथे एक हजार खाटांचे मोठे कोरोना केअर सेंटर सुरू करण्याची विनंती जिजाऊच्या वतीने केली गेली. पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी त्वरित मान्यता दिली. महाराष्ट्र दिनापासून १०० खाटांचे युनिट सुरु झाले आहे. पालघर जिल्ह्यातील हे एक हजार बेडचे प्रस्तावित सेंटर पूर्णपणे सुरू झाल्यावर अन्य सेंटरवरील ताण कमी होऊन जनतेची गैरसोय थांबेल”, असे यावेळी निलेश सांबरे म्हणाले.
यावेळी जिजाऊचे भगवान सांबरे, विक्रमगड प्रांताधिकारी डॉ. प्रियंका पाटील, तहसीलदार श्रीधर गालिपेल्ली, तालुका आरोग्य अधिकारी श्रीकांत कुलकर्णी, गटशिक्षण अधिकारी डॉ. राजेंद्र खताळ, नोडल अधिकारी डॉ. विजय ठक्कर, डॉ. निशिगंध टोपले, मंडल अधिकारी हेमांगी जाधव उपस्थित होते.
पाहा व्हिडीओ:
स्वकमाईतून समाजसेवा….समाजातील प्रत्येकाला न्याय देण्याचा ‘जिजाऊ’ वसा!
लिंक क्लिक करा आणि वाचा:
स्वकमाईतून समाजसेवा….समाजातील प्रत्येकाला न्याय देण्याचा ‘जिजाऊ’ वसा!