मुक्तपीठ टीम
संपूर्ण देशभरात कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रातही भीषण परिस्थिती आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे उपचार सुविधा अपुऱ्या पडत आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील काही लोकप्रतिनिधी प्रसंगी धोका पत्करुनही आपल्या लोकांसाठी धडपडत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेर विधानसभा मतदारसंघातील आमदार निलेश लंके यांचेही अशाच कार्यामुळे कौतुक केले जात आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघातील लोकांसाठी एक हजार खाटांच कोरोना सेंटर उभारले आहे.
आमदार निलेश लंके यांनी शरद पवार यांच्या नावाने उभारलेले कोरोना सेंटर पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे आहे. तेथे जवळजवळ १ हजार १०० खाटा आहेत. यामध्ये शंभर ऑक्सिजन बेड आहेत. विशेष म्हणजे या कोरोना उपचार केंद्रासाठी मोठ्या प्रमाणात समाजातूनही मदतीचा हात पुढे येत आहे.
आमदार निलेश लंके यांनी आवाहन केल्यानंतर १७ लाख रोख रक्कम आणि पाच टन धान्य जमा झाले आहे. तर, भाजीपाला, फळे, अंडी, किराणा, वाफ घेण्याची यंत्रे, कोमट पाण्यासाठी थर्मास अशा विविध वस्तूंचे वाटप रुग्णांना करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने यापूर्वी पारनेरमधील टाकळी ढाकेश्वर या ठिकाणी एक हजार बेडचे कोरोना सेंटर उभे केले होते. त्यामध्ये कोरोना रुग्णांसाठी पौष्टिक नाश्ता आणि जेवणासोबतच करमणुकीच्या साधनांचीही व्यवस्था करण्यात आली. त्या सेंटरमध्ये रुग्णांसाठी प्रोजेक्टर, मोबाईल गेम आणि कॅरम बोर्ड अशा अनेक गोष्टींची व्यवस्था करण्यात आली होती. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते १७ ऑगस्ट २०२० रोजी त्याचे उद्घाटन करण्यात आले होते.