मुक्तपीठ टीम
मुंबई म्हटलं की अंडरवर्ल्ड आठवतंच. त्यातही नव्वदच्या दशकात अंडरवर्ल्डची दहशत पराकोटीची वाढली होती. मोठी लग्न, नवी गाडी, घर, धंद्यात फायदा, काहीही घडलं तर अंडरवर्ल्ड खंडणी मागत असे. रस्त्यावर रक्ताचे सडे पडत. तसंच अंडरवर्ल्ड आता दिल्लीत फोफावलं आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने सोमवारी दिल्ली आणि लगतच्या राज्यांमधील गुंड आणि त्यांच्या साथीदारांवर मोठी कारवाई केली आहे. त्याचं कारण या माफिया गुंडांचे दहशतवाद्यांशीही संबंध असल्याचं उघडकीस आलं आहे.
गायक मुसेवाला खून प्रकरणी एनआयएने ५० ते ६० ठिकाणी छापेमारी केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने उचललेले हे पाऊल दिल्ली-एनसीआरमधील संघटित गुन्हेगारीविरोधातील पहिली धोरणात्मक कारवाई म्हणून पाहिले जात आहे. सोमवारी सकाळी एनआयए अधिकाऱ्यांनी नीरज बवाना आणि सुनील मान उर्फ टिल्लू ताजपुरिया यांसारख्या दिल्लीतील गुंडांच्या घरांवर छापे टाकले. अनेक जणांना अटक करण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे.
दिल्लीत पाच माफिया टोळ्यांची दहशत!
- दिल्लीत मुंबईत होते तसे अंडरवर्ल्ड डॉन नाहीत, पण कायद्याला फाट्यावर मारणारे अनेक गुंड आहेत.
- दिल्लीचे हे गुंड समोरच्याला मारण्यात कसलीही दयामाया दाखवत नाहीत.
- ते तुरुंगात किंवा कोर्टाच्या आवारातही गोळीबार करतात.
- केवळ विरोधातील गुंडच नाही, तर त्यांच्या कुटुंबीयांनाही आपले लक्ष्य करतात.
- पोलिसांवरही गोळ्या झाडायला ते मागेपुढे पाहत नाही.
- आजकाल त्याचे फॅन फॉलोअर्सही मोठ्या संख्येने सोशल मीडियावर दिसू लागले आहेत.
दिल्लीतील पाच मोठे गुंड
- दिल्लीत पाच मोठ्या माफिया टोळ्यांची भीती आहे.
- त्यात नीरज बवाना, सुनील मान उर्फ टिल्लू ताजपुरिया, कला जथेडी, जितेंद्र गोगी आणि लॉरेन्स बिश्नोई-गोल्डी ब्रार यांचा समावेश आहे.
कारवाईला कारण ठरले लॉरेन्स बिश्नोई-गोल्डी ब्रार!
- लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांनी सुरुवातीला पंजाबमध्ये त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरू केल्या, पण जितेंद्र गोगी आणि काला राणा टोळीच्या दिल्लीतील गुंडांशी सहकार्य केल्यानंतर त्यांनी दिल्लीपर्यंत त्यांचे नेटवर्क विस्तारले.
- पंजाबमधील मानसा जिल्ह्यात २९ मे रोजी पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येप्रकरणी या दोघांची नावे समोर आली आहेत.
- लॉरेन्स बिश्नोई दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद होता आणि त्याचा सहकारी गोल्डी ब्रार कॅनडातून एक टोळी चालवतो.
- फक्त तीन दिवसांपूर्वी, दिल्ली पोलिसांनी बिष्णोई-ब्रार टोळीच्या तीन सदस्यांना अटक केली, जे ब्रार यांच्या सूचनेनुसार दिल्लीत आले होते.