मुक्तपीठ टीम
एकीकडे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीच्या धोरणावर जोर दिला जात असतानाच दुसरीकडे काही सरकारी कंपन्या जबरदस्त कामगिरी बजावत आहेत.
एनएचपीसी लिमिटेड या भारताच्या प्रमुख जलविद्युत कंपनीने एनएचपीसीला ३,२३३ कोटी रुपयांचा नफा कमवला आहे. गेल्या वर्षापेक्षा हा नफा तब्बल २०० कोटी जास्त आहे.
गेल्या आर्थिक वर्षातील 3,007.17 कोटी रुपयांच्या तुलनेत एनएचपीसीने आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 3,233.37 कोटी रुपयांचा सर्वाधिक निव्वळ नफा कमावला आहे. आर्थिक वर्ष 2020-21 च्या व्यवहारातून मिळालेला महसूल 8,506.58 कोटी होता, जो मागील आर्थिक वर्षात 8,735.15 कोटी रुपये होता. 2020-21 वर्षासाठी एकत्रित निव्वळ नफा 3,582.13 कोटी रुपये असून 2019-20. मध्ये तो 3,344.91 कोटी रुपये होता.
सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीतही एनएचपीसी वीज निर्मिती केंद्रांनी आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 24471 दशलक्ष युनिट्स (एमयू) इतकी वीजनिर्मिती केली.
संचालक मंडळाने मार्च 2021 मध्ये कंपनीने आधीच दिलेल्या प्रति समभाग 1.25/- रुपयाच्या अंतरिम लाभांशाव्यतिरिक्त आर्थिक वर्ष 2020-21साठी प्रति समभाग 35 पैसे अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे. एनएचपीसीचे सध्या सुमारे सात लाख भागधारक आहेत.
एनएचपीसीचे सीएमडी ए. के. सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीतही एनएचपीसी जलविद्युत विकासाच्या मुख्य व्यवसायासह सौर आणि पवन उर्जा विस्ताराची योजना आखत आहे.