मुक्तपीठ टीम
टीव्ही पत्रकारांच्या अनुभव विश्वाची सफर घडविणार्या न्यूजरुम लाईव या दिवाळी अंकाचे प्रकाशन काल शिवसेना खासदार संजय राउत आणि भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांच्या हस्ते तसेच अभिनेत्री तेजस्विनी पंडितते यांच्या उपस्थितीत मुंबईत एका शानदार कार्यक्रमात झाले. राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्या खुमासदार भाषण आणि टोलेबाजीने कार्यक्रम रंगतदार झाला. यावेळी मराठी भाषा गौरव पुरस्कार ही प्रदान करण्यात आले.
मुंबईसह राज्यभरात काम करणार्या टीव्ही पत्रकारांचे अनुभव, त्यांचे जग, आव्हाने याबाबत पत्रकारांना लिहितं करणारा न्यूजरुम लाईव्ह हा दिवाळी अंक गेले ८ वर्ष प्रकाशित होत आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या कार्यक्रमाला शिवसेना खासदार संजय राउत, भाजपा नेते आमदार आशिष शेलार, अभिनेत्री तेजस्विनी पंडित, अंकाचे मुख्य संपादक कमलेश सुतार, कार्यकारी संपादक प्रशांत डिंगणकर, टीवीजेएचे अध्यक्ष विनोद जगदाळे, वरिष्ठ पत्रकार उदय तानपाठक, जितेंद्र दिक्षित यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.
यावेळी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करणार्यांना मराठी भाषा गौरव पुरस्कार ही प्रदान करण्यात आले. ओटीटीच्या जगात मराठी भाषेसाठी स्वतंत्र आणि नवीन जागा निर्माण करणारे प्लँनेट मराठी या पहिल्या मराठी ओटीटी प्लँटफाँर्मचे निर्माते अक्षय बर्दापुरकर आणि मराठी साहित्य वाचनालयाची चळवळ जनमानसात गेली ४ दशके रुजवणारे पुंडलिक पै यांना मराठी भाषा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या प्रकाशन कार्यक्रमात व्यासपीठावर एकत्र आलेले संजय राऊत आणि आशिष शेलार हे ही कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. दोन्ही नेत्यांनी आपल्या भाषणात तुफान टोलेबाजी करत रंगत आणली. आमदार अँड आशिष शेलार यावेळी बोलताना म्हणाले, तीन वेगवेगळ्या गाड्यांचे टायर एकत्र करुन रिक्षा करावी तसे राऊत साहेबांनी हे सरकार केले आहे. तुम्ही काहीही करु शकता तेव्हा आता महाराष्ट्रासाठी काही तरी करा. आता मास्क दूर करत खरा चेहरा दाखवा असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला. या दिवाळी अंकात एक लेख आहे, कभी कभी मुझे लगता है हम क्या कर रहें है? या लेखाचा आधार घेत आशिष शेलारांनी राजकारण, समाजकारणात काय चालल आहे याचा प्रश्न आपल्याला पडतो असे ही म्हटले. तर हाच सवाल त्यांनी संजय राऊत यांना ही विचारला. तर तुम्ही आता भगवा बाँम्ब फोडा असेही आवाहन केले.
खासदार संजय राऊत म्हणाले, राजकारण अत्यंत चंचल असतं त्यापेक्षा बहुमताचा आकडा असतो, १४५ ची बेरीज हे दुसऱ्या पद्धतीने करू शकतात हे आपले संविधान आणि लोकशाही सांगते, एका चिडीतून हे सरकार झालं आहे, त्या चिडीत तेल टाकण्याचं काम करू नका. पण आता उपयोग नाही, हवेची दिशा बदललेली आहे, तीन वर्षे तीच रहाणार आहे, हवेची दिशा आम्ही बदलली आहे का ? आपण राजकीय पातळी सोडून नको त्या विषयाकडे गेलो आहोत, जे बोलू नये ते बोलत आहोत, ज्या गोष्टी घडू नयेत त्या घडत आहेत, हे महाराष्ट्राचे राजकारण नाही. महाराष्ट्र टिकवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची कोर कमिटी असली पाहिजे.” अस ही ते आशिष शेलार यांना उद्देशून म्हणाले. सद्यस्थितीवर भाष्य करताना या राज्यात दंगल ही हिंदूंना परवडणार नाही आणि मुसलमानांनाही परवडणार नाही अस ही त्यांनी सांगितल.
यावर्षीचा अंक नोबेल पुरस्कार मिळवणार्या रशियातील पत्रकार मारिया रेस्सा आणि दिमीत्री यांना अर्पण करण्यात आला असल्याच संपादक कमलेश सुतार यांनी सांगितले. या अंकात कोविड काळातील पत्रकारांचे अनुभव, सोशल मिडियाचा वाढता प्रभाव, माध्यमांचे बदलते स्वरुप, आर्टिफिशल इंटेलिजन्स आणि माध्यमं, नागरिकत्व अशा विविध विषयांवर पत्रकारांनी आपले विचार, अनुभव लिहिले असून हा अंक शब्दांचा उत्सव साजरा करणारा आहे असे कार्यकारी संपादक प्रशांत डिंगणकर म्हणाले.