मुक्तपीठ टीम
मतदानानंतर येणारे एक्झिट पोल सामान्यत: निकालांचा कल दर्शवतात. कधी एक्झिट पोलचे अंदाज पूर्णपणे चुकीचे ठरतात तर कधी अंदाज अचूक ठरतात. असेच काहीसे यावेळी घडले असून, अनेक एक्झिट पोलचे अंदाज चुकले तर काहींचे अंदाज खरे ठरले आहेत. यापैकी एक एक्झिट पोल अगदी अचूक ठरला आहे आणि तो होता News 18 Matrize यांनी केलेले सर्वेक्षण. या सर्वेक्षणात भाजप युतीला २६५ ते २७७ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता, तो अगदी बरोबर ठरला आहे. भाजपला एकूण २५५ जागा मिळाल्या असून अपना दलने १२ जागा जिंकल्या आहेत. दुसरा मित्रपक्ष असलेल्या निषाद पक्षाला ६ जागा मिळाल्या.
एकंदरीत भाजपा आघाडीला २७३ जागा मिळाल्या असून त्यामुळे Matrize यांचा एक्झिट पोल अगदी अचूक ठरला आहे. एवढेच नाही तर सपा आघाडीला ११९ ते १३४ जागांचा अंदाज वर्तवण्यात आलेल्या समाजवादी पक्षासाठी Matrize यांचा एक्झिट पोल खरा ठरला असून त्याला १२५ जागा मिळाल्या आहेत. याचाच अर्थ Matrize सर्वेक्षणामध्ये भाजपा आणि सपा या दोन्ही पक्षांसाठी जागांचा अंदाज अचूक ठरला आहे. मात्र, इतर अनेक एक्झिट पोल चुकीचे सिद्ध झाले आहेत.
टुडेज चाणक्य यांच्या सर्वेक्षणात भाजपा आघाडीला २९४ जागा मिळतील, तर सपा आघाडीला १०५ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. हा अंदाज पूर्णपणे चुकीचा नव्हता, परंतु तो वास्तवापासून थोडा दूर होता. याशिवाय, इंडिया टुडे माय एक्सेसच्या सर्वेक्षणात भाजपा आघाडीला २८८ ते ३२६ जागा मिळतील, असे म्हटले होते, तेही वास्तवापासून दूर राहिले. या सर्वेक्षणात सपा आघाडीला ७१ ते १०१ जागा मिळतील असे सांगण्यात आले होते. याशिवाय पोलस्ट्रॅट, टाईम्स नाऊ व्हेटो, रिपब्लिक पी. मार्क आणि एबीपी न्यूज-सी व्होटर यांच्या सर्वेक्षणात भाजपा आघाडीला २५० च्या खाली जागा मिळण्याचा अंदाज चुकीचा ठरला. या सगळ्यात सपाला १४० पेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता, पण तोही खरा ठरला नाही.