मुक्तपीठ टीम
कोरोनाचा उद्रेक वाढत असतानाच जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डब्ल्यूएचओने कोरोनाचा नवा व्हेरिएंट ४४ देशांत पोहोचला, अशी माहिती दिली आहे. त्या बातम्या देताना माध्यमांमध्ये नव्या व्हेरिएंटचा उल्लेख भारतीय व्हेरिएंट करण्यात आला आहे. माध्यमांमधील या उल्लेखाला भारत सरकारने आक्षेप घेतला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या व्हेरिएंटला ‘भारतीय’ म्हणून संबोधले नसल्याकडे सरकारने माध्यमांचे लक्ष वेधले आहे.
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यूएचओने बी.१.६१७ या वैज्ञानिक नावाने त्याचा उल्लेख केला आहे. पण माध्यमांनी मात्र या प्रकाराला ‘भारतीय व्हेरिएंट’ म्हटले आहे, जे पूर्णपणे चुकीचे आहे. सध्या ब्रिटन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेच्या व्हेरिएंटनंतर कोरोनाचा हा चौथा प्रकार मानला जात आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोनाच्या ज्या व्हेरिएंटमुळे परिस्थिती बिघडली आहे तो व्हेरिएंट जगातील अनेक देशांमध्ये आढळून आला आहे. भारताबाहेर ब्रिटनमध्ये या व्हेरिएंटच्या सर्वाधिक संसर्ग आढळला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला डब्ल्यूएचओने बी .१.६१७ ची घोषणा केली. जो म्युटेंट आणि वैशिष्ट्यांमुळे चिंताजनक प्रकार म्हणून ओळखला जातो. म्हणूनच ब्रिटन, ब्राझिल आणि दक्षिण आफ्रिकेनंतर कोरोनाच्या इतर तीन व्हेरिएंटच्या यादीत समावेश झाला.