मुक्तपीठ टीम
बीड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संदीप क्षीरसागर यांना मोठा धक्का बसल्याचे समजले जात आहे. शिवसेना नेते आणि काका जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्यातील वाद संपूर्ण बीड जिल्ह्याला माहित आहे. निवडणूक जवळ आली असताना जयदत्त क्षीरसागर यांनी संदीप क्षीरसागर यांच्या गटातील पाच नेते फोडण्यात यश मिळवले आहे. येत्या २८ मार्च रोजी बीडमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात हे पाचही जण राष्ट्रवादी काँग्रेसला राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मागील दीड वर्षांपासून हे नगरसेवक पक्षावर आणि संदीप क्षीरसागर यांच्यावर नाराज असल्याचे समजले जात होते.
या कारणांमुळे शिवसेनेचा पर्याय निवडला…
- आमदार संदीप क्षीरसागर यांच्या गटातील हे नेते मागील दीड वर्षांपासून अलिप्त आहेत.
- कोरोना काळात त्यांनी नागरिकांना मोठी मदत केली.
- अत्यवस्थ नागरिकांना बेड मिळवून देण्यापासून अनेक प्रकारे लोकोपयोगी कामे केली.
- मात्र आमदार क्षीरसागरांकडून लहान-सहान कार्यकर्त्यांकडून कामाच्या मोबदल्यात टक्केवारी घेतली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
- तसेच नगरसेवकांनी त्यांच्या वॉर्डात मंजूर करून घेतलेल्या विकासकामात आडकाठी आणणे, कार्यकर्त्याचे म्हणणे ऐकून न घेणे, नगरपालिका, जिल्हा परिषदेला लोकसंख्येच्या निकषावर येणारा विधी स्वतः मंजूर करून आणल्याचे भासवणे असे प्रकार होत असल्याचा आरोप या नाराज पाच नेत्यांनी केला आहे.
- तसेच पाच नेत्यांची स्वतंत्र आघाडी करण्याऐवजी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना साथ देण्याचे त्यांनी ठरवले आहे.
- जयदत्त क्षीरसागर हे विकास करू शकतात, या विश्वासाने आम्ही शिवसेनेचा पर्याय निवडल्याचे या पाच जणांनी सांगितलं.
- सोमवारी बीडमध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमात हे पाचही नेते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
- माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम पार पडेल, अशी माहिती मिळाली आहे.
हे नेते शिवसेनेत येणार
- नगरसेवक अमर नाईकवाडे
- नगरसेवक फारूक पटेल
- जिल्हा परिषद सदस्य गंगाधर घुमरे
- उद्योजक बाबूसेठ लोढा
- नितीन लोढा