मुक्तपीठ टीम
नवी मुंबई विमानतळाला कोणाचं नाव द्यायचं? यावरून वाद शिगेला पोहोचला आहे. नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी स्थानिक प्रकल्पग्रस्त नागरिकांकडून जोर धरत आहे, तर शिवसेनेकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी होतं आहे. प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी सकाळपासून सिडको घेराव आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.टाळ मृदंगाच्या गजरात, हातात दि बा पाटील यांच्या नावाच्या समर्थनार्थ पोस्टर, झेंडे घेत आंदोलन करत आहेत.
नवी मुंबईतील आंदोलकांचं शिष्टमंडळ सिडको भवनाकडे रवाना झाले आहे. संजीव नाईकांच्या नेतृत्वाखाली ls शिष्टमंडळ निवेदन देणार आहे.
दि.बा.पाटलांच्या नावासाठी संघर्ष
- नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचं नाव देण्यासाठी भाजापचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने संघर्ष सुरु आहे.
- विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी स्थानिक आग्रही आहेत.
- अनेक संस्था, संघटनांनी आणि राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबतच्या मागण्यांची निवेदने सिडको, राज्य सरकारकडे दिलेले आहेत.
- काही महिन्यांपूर्वी शिवसेना नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केल्यानंतर सिडको संचालक मंडळाने बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव सरकारकडे पाठवल्यानंतर हा वाद निर्माण झाला.
प्रकल्पग्रस्त नेत्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात
- मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे येथून पोलीस नवी मुंबईमध्ये बंदोबस्तावर आहेत.
- तसेच राज्य राखीव दलाच्या ७ तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.
- जवळपास ५०० पेक्षा जास्त वरिष्ठ अधिकारी आंदोलन दाखल झाले आहेत.
वाहतुकीत अनेक बदल
- नवी मुंबईत कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं पोलिस प्रशासनानं काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
- यात सर्वात महत्वाचं म्हणजे नवी मुंबईतील महत्त्वाचे रस्ते आणि वाहतूकीत बदल करण्यात आला आहे.
- नवी मुंबईत अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
- तसेच वाहतुकीतही मोठे बदल करण्यात आलेले आहेत.
- सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे.
- वाशी टोल नाका, वाशी गाव, पाम बीच मार्ग शिळ फाटा या मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे.
- तर सकाळी ८ ते रात्री ८ असा १२ तास कळंबोली ते बेलापुर आणि वाशी ते बेलापूर रस्त्यावर वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
- त्याशिवाय हलक्या वाहनाच्या वाहतुकीचा मार्ग वळवण्यात आला आहे.
- तर कोपरखैरणे ते सीबीडी, खारघर ते सीबीडी आणि नेरुळ ते सीबीडी अंतर्गत मार्ग राहणार पूर्णपणे बंद राहणार आहे.
- तसेच मुंबईतून पुण्याकडे जाणारी वाहतूक महापे शिळफाटा मार्गे पुण्याकडे जाईल.
- तर पुण्यावरून येणारी वाहतूक तळोजा, मुंब्रा, महापे मार्गे मुंबईत येईल.
दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनी आज सिडकोला घेराव घालण्यात येत आहे. ज्येष्ठ आणि तरुणांची फौज या आंदोलनात महत्वाची भूमिका पार पाडत आहे. दुसरीकडे वटपौर्णिमाचे पूजन करून आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.