ब्रिटनमध्ये आता कोरोना विषाणूचे बदलते रूप पाहायला मिळत आहे. जे अधिक घातक ठरत आहे. बदलत्या रूपात ब्रिटनमध्ये कोरोना संक्रमण वेगाने पसरत आहे. युरोपातील चार देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील आरोग्य मंत्रालयाने व्हायरसच्या या नव्या स्वरूपावर चर्चा करण्यासाठी सोमवारी जॉइंट मॉनिटरिंग ग्रुपची तातडीची बैठक बोलावली आहे. याआधीही बाधित देशांशी हवाईसेवा उशिरापर्यंत सुरु राहिल्यानेच मुंबईसह भारतात कोरोना वेगानं पसरल्याचं मानलं जातं. त्यामुळे या बैठकीत ब्रिटनशी हवाई सेवेबद्दल निर्णयाची अपेक्षा आहे.
आरोग्य सेवा महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल. भारतातील जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. रॉडेरिको एच. ओ. फ्रिन देखील या बैठकीस उपस्थित राहू शकतात.
ब्रिटनमध्ये पुन्हा लॉकडाऊन
कोरोना विषाणूच्या बदलत्या रूपामुळे वाढत असलेलं संक्रमण रोखण्यासाठी लंडन आणि ब्रिटनच्या काही भागांमध्ये २० डिसेंबरपासून पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर केले आहे. या मुळे पुन्हा एकदा नागरिकांना घराच्या चार भितींआड राहावं लागत आहे. एवढेच नाही तर आवश्यक वस्तूंची दुकानेही बंद ठेवण्यात आली आहेत.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी कोरोना विषाणूचं बदलते रूप हे संपूर्ण देशात संसर्ग वेगाने पसरवण्यासाठी जबाबदार ठरू शकते असे म्हटले आहे. या आधीच्या विषाणूपेक्षा हा नव्या रूपातील कोरोना ७० टक्के वेगाने पसरते आहे. त्यामुळे युरोपियन देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांना बंदी घातली आहे. तसेच भारतातही ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घालावी अशी मागणी केली जात आहे.