मुक्तपीठ टीम
स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. सरकारकडून याला आणखी संस्मरणीय बनवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यातीलच एक प्रयत्न म्हणजे अमृत महोत्सवानिमित्त नव्या नाण्यांची शृंखला जारी करण्यात येणार आहे. म्हणजेच नाण्यांच्या माध्यमातून अमृत महोत्सवीवर्ष अधिक संस्मरणीय केले जाणार आहे. भारत सरकार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला समर्पित १ रुपया ते २० रुपयांच्या नाण्यांची नवीन मालिका जारी करणार आहे. अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने त्याची अधिसूचना जारी केली आहे.
१,२,५,१० आणि २० रूपयांची नाणी
- अधिसूचनेनुसार, चलनात असलेल्या नाण्यांची १, २, ५, १० आणि २० रुपयांची किंमत असेल.
- १ ते १० रुपयांची नाणी गोलाकार असतील आणि २० रुपयांची नाणी पॉलिहेड्रल (१२ कडांचा बहुभुज) असेल.
- पाच नाण्यांच्या एका बाजूला ‘आझादी का अमृत महोत्सव’च्या अधिकृत लोगोचे चित्र असेल.
- त्याच्याखाली नाण्याचे मूल्य लिहिले जाईल.
- परिघाच्या वरच्या भागावर स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष लिहिलेले असेल.
- सर्व नाण्यांवर दुसऱ्या बाजूला अशोक स्तंभाचे चिन्ह असेल, डाव्या बाजूला भारत आणि उजवीकडे ‘सुधारित’ लिहिलेले असेल.
एक आणि दोन रुपयांची नाणी स्टेनलेस स्टीलची असतील तर ५, १० आणि २० रुपयांची नाणी मिश्र धातूची (निकेल, तांबे आणि जस्त) असतील. २० मिलिमीटर (मिमी) व्यासाच्या १ रुपयाच्या नाण्याचे वजन ३.९ ग्रॅम, २३ मिमीच्या २ रुपयांच्या नाण्याचे वजन ४.७ ग्रॅम, २५ मिमीच्या ५ रुपयांच्या नाण्याचे वजन ६.७४ ग्रॅम, २७ मिमी १० रुपयांचे नाणे ७.७२ ग्रॅम वजनाचे आहे. २० रुपयांचे नाणे ८.५४ ग्रॅम वजनाचे असेल. नाण्यांवर टांकसाळीचे वर्षही लिहिले जाईल.
भारत सरकार ही नाणी चलनात आणणार की अमृत महोत्सवाच्या स्मरणार्थ म्हणून ठेवणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नाण्यांचा अभ्यास करणारे सुधीर लुणावत यांनी सांगितले की, “सरकार नोटिफिकेशनमध्ये नाण्यांच्या चलनाची माहिती देते. सरकारने सुमारे तीन वर्षांपूर्वी नाण्यांची नवीन मालिका जारी केली होती, त्यानंतर अधिसूचनेत त्यांच्या चलनाबाबतही माहिती देण्यात आली होती. यावेळी याबाबत अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आलेले नाही.”