मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊन करताना गरिबांना मोफत रेशन उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ११ एप्रिल, २०२१ रोजी मागणी केली होती. यात ज्या नागरिकांकडे रेशन नाही अशा वंचित नागरिकांना रेशन उपलब्ध करून देण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात यावी अशी देखील सूचना सदरील पत्रात केली होती. गरीब व गरजू नागरिकांना एप्रिल, मे, जून २०२१ मध्ये मोफत धान्य पुरविण्याच्या अनुषंगाने शासनाने निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील एकूण पात्र शिधापत्रिकांपैकी ९०% शिधापत्रिकाधारक ऑनलाइन पद्धतीने अन्नधान्याचा लाभ घेत आहे. उर्वरित १०% पात्र शिधापत्रिकाधारकांचा शोध घेऊन त्यांना धान्याचा लाभ मिळणेकरीता स्वयंसेवी संस्थांना जनजागृती करण्याकरिता अवगत करण्यात आले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्याचा लाभ मिळणेकरिता “माझे रेशन माझा अधिकार”असा मंच करून स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने जनजागृती करण्यात येत आहे याबद्दल डॉ.गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे आभार मानले आहेत.
घेण्यात आलेल्या निर्णयात ऑन लाईन digitized न झालेल्या कार्ड धारकांना ही लाभ देण्यात येणार आहे. राष्ट्रीय portability नुसार परराज्यातील कामगारांना धान्य देणार असून या सर्वबाबत सामाजिक संस्थांना जनजागृती करावी असे आव्हान देखील नियंत्रज शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांच्याकडून करण्यात आले आहे.
कोरोनाच्या निर्बंधांचे पालन होण्यासाठी कार्ड धारकाना धान्य नेण्यासाठी निश्चित वेळ कळावी म्हणून मोबाईल वर एसएमएस दिले जात आहेत. या सर्व उपक्रमाचे डॉ गोऱ्हे यांनी स्वागत केले. याबद्दल डॉ.गोऱ्हे यांनी वारंवार सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधी सोबत बैठक घेऊन विचारमंथन केले होते. या संस्थांच्या प्रतिनिधींनी डॉ.गोऱ्हे यांचे व शासनाचे आभार मानले आहेत.