मुक्तपीठ टीम
” वातावरणातील बदलाचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो हे आता सप्रमाण सिद्ध झालेले आहे आणि जगभरातील सर्व तज्ञांनी मान्य केलेले आहे. या पार्श्वभूमीवर वातावरणातील बदलाकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याची गरज असून या नकारात्मक बदलांना आळा घालण्यासाठी आवश्यकता भासल्यास कठोर पावले उचलण्याची तसेच महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे,” असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज केले. राष्ट्रीय वातावरणातील बदल आणि मानवी आरोग्य कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय गव्हर्निंग बॉडी तसेच टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये ते बोलत होते.
पर्यावरणाचा होत असणारा -हास, हरितगृह वायूंचे वाढते उत्सर्जन यामुळे वातावरणातील बदलांना अधिक गती मिळते आहे. वातावरणातील बदलांचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, हे आता सर्वांच्याच लक्षात आले आहे. क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिगच्या प्रक्रियेस खीळ घातली नाही तर ही पृथ्वी सजीवांना राहण्यायोग्य राहणार नाही.
या सर्व समस्याना नेमका प्रतिसाद देण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय वातावरणातील बदल आणि मानवी आरोग्य हा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाच्या राज्य गव्हर्निंग बॉडी आणि टास्क फोर्सची मीटिंग आज आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीसाठी अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य डॉ प्रदीप व्यास, आयुक्त आरोग्य सेवा, डॉ रामास्वामी, संचालक आरोग्य सेवा डॉ साधना तायडे, संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन डॉ म्हैसेकर, भारतीय हवामान खात्याचे पुणे विभाग प्रमुख डॉ. होसोलीकर तसेच पर्यावरण, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, भूजल सर्वेक्षण, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे वैज्ञानिक उपस्थित होते.
यावेळी या कार्यक्रमाचे राज्य नोडल अधिकारी डॉ प्रदीप आवटे यांनी वातावरणातील बदल आणि मानवी आरोग्य संदर्भातील सादरीकरण केले. वातावरणातील बदल ही बाब आंतरविद्याशाखीय असल्याने या महत्वपूर्ण बाबीस समर्थपणे तोंड देण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ञांची मदत घेण्याची गरज आहे, हे यावेळी डॉ. आवटे यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाच्या अंतर्गत राज्यात पर्यावरणीय आरोग्य कक्ष स्थापन करण्यात आला असून उष्णतेमुळे होणारे विकार तसेच राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये श्वसन संसर्गाचे सर्वेक्षण या कार्यक्रमाअंतर्गत करण्यात येते आहे. वातावरणातील बदल आणि मानवी आरोग्य या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्वसामान्य जनता लोकप्रतिनिधी आणि आरोग्य विभागातील अधिकारी,कर्मचारी यांच्यामध्ये यासंदर्भात जाणीव जागृती निर्माण करण्याकरता विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागातील आरोग्य संस्था पर्यावरणस्नेही आणि सक्षम बनवल्या याकरिता देखील प्रयत्न करण्यात येणार आहेत. प्रत्येक आरोग्य संस्थेमध्ये ऊर्जा आणि पाणी वापराचे धोरण अधिकाधिक पर्यावरणस्नेही कसे बनवता येईल यासाठी संपूर्ण राज्याकरता काही धोरण आखण्याची आवश्यकता देखील बैठकीतील तज्ञांनी व्यक्त केली. सार्वजनिक आरोग्य विभागातील वाहनांसाठी प्रदूषण कमी होईल अशा पद्धतीचे इंधन किंवा अपारंपारिक स्त्रोत निवडणे देखील आवश्यक आहे, यामुळे आपल्या पर्यावरणावरील कार्बनच्या पाऊलखुणा कमी करण्यामध्ये मदत होईल. वातावरणातील बदलांचा साथ रोगांवर होणारा बदल समजून घेऊन त्या नुसार कार्यवाही करण्यासाठी भारतीय हवामान खात्यासोबत नियमित समन्वय ठेवण्याचे या बैठकीमध्ये निश्चित करण्यात आले.
उष्णतेमुळे होणारे विकारांचे सर्वेक्षण, हिट अँक्शन प्लानची आवश्यकता, वातावरणातील बदलास तोंड देण्यासाठी सदृढ आरोग्य यंत्रणा उभी करणे अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. भारतीय हवामान खात्याचे डॉ होसोलिकर यांनी यावेळी राज्याच्या हवामानाचा आणि त्या संदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाशी समन्वयाने काम करण्याची निकड प्रतिपादन केली.
वातावरणातील बदलांचा मुकाबला सक्षमरित्या करण्यासाठी पर्यावरण, हवामान विभाग, भूजल सर्वेक्षण ,कृषी ,सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ , आपत्ती व्यवस्थापन विभाग अशा सर्वांनी एका प्लॅटफॉर्मवर येवून काम करण्याची आवश्यकता आहे,असे प्रतिपादन यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले.
वातावरणातील बदल आणि मानवी आरोग्य संदर्भातील राज्याचा कृती आराखडा लवकरच सादर करण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले.