मुक्तपीठ टीम
प्रजासत्ताक दिनी देशाच्या राजधानीत झालेल्या हिंसाचाराची चिथावणी दिल्याचा आरोप असलेल्या अभिनेता दीप सिद्धूला शोधण्यासाठी दिल्ली पोलीस पंजाबात पोहचले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या हिंसाचारासाठी दीप सिद्धूच जबाबदार असून तोच खलनायक असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे. त्याच्याविरोधात कारवाईसाठी दिल्ली पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी धाडी घालत आहेत.
शेतकरी ट्रॅक्टर रॅलीत शेतकरी आंदोलक म्हणवणाऱ्या काहींकडून हिंसाचार झाला. त्यासाठी तसेच शेतकऱ्यांना दिल्लीच्या लाल किल्ल्यापर्यंत घेऊन जाणाऱ्या आणि तेथील हिंसाचाराचे नेतृत्व केल्याचा आरोप लावलेल्या पंजाबी अभिनेता दीप सिद्धूला अद्याप दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आलेली नाही. गेल्या चार दिवसांपासून दिल्ली पोलिसांच्या चार तुकड्या पंजाबच्या वेगवेगळ्या परिसरात दिप सिद्धूचा शोध घेत आहेत.
“दीप सिद्धू आपला मोबाइल बंद करून गायब झाला आहे. तर शनिवार, ३० जानेवारीच्या संध्याकाळी त्याने फेसबुकवर दावा केली की तो काही पुरावे गोळा करतो आहे. पुरावे हाती लागल्यावर स्वत: दिल्ली पोलिसांना शरण जाणार आहे.
तर दुसरीकडे लाल किल्ल्यातील तोडफोड आणि हिंसा करणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी विविध एजन्सी सतत लाल किल्ल्याला भेट देत आहेत. असे सांगितले जात आहे की, रॅलीत सहभागी झालेल्या अनेक वाहनांचे मालक आणि हिंसाचार करणाऱ्या व्यक्तींची ओळख पटली आहे. गुजरातमधील फॉरेन्सिक टीमने रविवारी लाल किल्ल्यावर आयटीओसह अनेक ठिकाणी भेट दिली आहे.
राकेश टिकैतसह नऊ शेतकरी नेत्यांना चौकशीसाठी पुन्हा हजर होण्यासाठी नोटिस बजावली आहे. त्यांना गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच ७० हून अधिक ट्रॅक्टरच्या मालकांनाही चौकशीत सहभागी होण्यासाठी नोटिस पाठविण्यात आली आहे. याच आठवड्यात त्यांचीही चौकशी केली जाणार आहे.
दरम्यान, हिंसाचार करणाऱ्यांची आणि त्यांच्या वाहानांची ओळख पटविण्याची प्रक्रिया सतत सुरूच आहे. तसेच हिंसाचार करणाऱ्यांची ओळख जशी पटत चालली आहे, त्यांना चौकशीसाठी स्थानिक पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखा नोटिस बजावत आहेत. आतापर्यंत दिल्ली पोलिसांनी हिंसाचाराच्या प्रकरणी ३८ एफआयआर नोंदविले असून ८४ जणांना अटक केली आहे.