मुक्तपीठ टीम
पुणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभेची बैठक पालिका आणि विकासात्मक मुद्द्यांवरील वादविवादासाठी नेहमी चर्चेत असते. परंतु गेल्या आठवड्यात वादाचा मुद्दा हा बिर्याणीचा होता. हडपसर येथील कचरा डंपिंग प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी वेगळीच युक्ती लढवली. ते पुणे मनपात बिर्यानी घेऊन गेले, मात्र भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी बिर्याणीच्या लक्षवेधी क्लुप्तीला विरोध केला.
गेल्या काही महिन्यांपासून नगरसेवक ससाणे हे हडपसरमधील रामटेकडी कचरा डंपिंगचा मुद्दा उपस्थित करत आहेत. कोरोनामुळे सध्या सर्वसाधारण सभा नेहमीसारख्या घेता येत नाहीत. परंतु या मर्यादित चर्चांमधून काहीच साध्य होत नाही. त्यामुळे नगरसेवक ससाणे यांनी लक्ष वेधण्यासाठी वेगळी क्लुप्ती केली.
नगरसेवक ससाणे पुणे मनपाच्या सर्वसाधारण सभेसाठी बिर्याणीने भरलेलं मडकं घेऊन भेटायला गेले. महापौर बैठकीत चहा आणि खारी देतात. त्यांची बैठक तेवढ्यावरच संपते. काहीच साध्य होत नाही. त्यामुळे आपण बिर्याणी घेऊन आलो आहे. आता तरी बैठक बिर्याणीएवढीच लांबावी, माझ्या प्रभागातील कचरा समस्येवर तोडगा काढावा, असे ससाणे म्हणाले. परंतु, बैठक सुरू होताच, भाजप नगरसेवक आणि माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी तातडीने आक्षेप घेतला.
महापौर मुरलीधर मोहोळ यांना मात्र ससाणेंची क्लुप्ती आवडली नाही, “नगरसेवकांचा नेहमीच सन्मान केला जातो, परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांनी अशा पद्धतीने वागावे. निषेधाची ही पद्धत चुकीची आहे.
या विषयावर चर्चा करताना, ससाणे यांनी नंतर हडपसरच्या रामटेकडी प्लांटमध्ये एक लाख मेट्रिक टन कचरा डंपिंगसाठी आला असल्याचे सांगितले. पालिका प्रशासनाने हे प्रकरण ६० दिवसात निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते, परंतु आजपर्यंत कचरा उचलला गेला नाही. जिथे कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची सोय नाही तिथे कचरा का डंप केला जातो असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तिथे असणारे मोबाईल प्रक्रिया युनिट पुरेसे नसल्याचे त्यांनी सांगितले.
अखेर महापौर मोहोळ यांनी नागरी प्रशासनाला या विषयाची दखल घेण्यास सांगितले आणि अतिरिक्त आयुक्तांना संबंधित नगरसेवकांशी त्वरित चर्चा करून मार्ग काढण्यास सांगितले.