मुक्तपीठ टीम
बलात्कार आणि हत्या झालेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाचे फोटो सोशल मिडियावर शेअर केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे ट्विटर खाते लॉक करण्यात आले होते. काँग्रेसने त्याविरोधात आवाज उठवला. त्यानंतर आता राहुल गांधी यांचे ट्विटर खाते एका आठवड्यानंतर अनलॉक करण्यात आले आहे. मात्र आता राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने त्यांच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. आयोगाने पत्र लिहून फेसबुककडे मागणी केली आहे.
याआधी ४ ऑगस्ट रोजी आयोगाने ट्विटरला पत्र लिहून राहुल गांधींच्या हँडलवर कारवाई करण्याची मागणी केली होती. यानंतरच ट्विटरने काही काळ त्याचे अकाऊंट लॉक केले होते. एवढेच नाही तर कॉंग्रेस पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांचे अकाऊंटही लॉक केले.आता एका आठवड्यानंतर सर्वांचे अकाऊंट अनलॉक करण्यात आले आहे.
राहुल गांधी यांनी ही पोस्ट इंस्टाग्रामवरही शेअर केली होती. यासंदर्भात आयोगाने फेसबुकला पत्र लिहिलेले की,अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाची ओळख राहुल गांधींच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये उघडकीस आली आहे. या व्हिडिओमध्ये पीडित मुलीच्या आई आणि वडिलांचे चेहरे स्पष्टपणे दिसत आहेत. हे कायद्याचे उल्लंघन असल्याचे आयोगाचे म्हणणे आहे. असे करणे हे पॉक्सो कायदा आणि किशोर न्याय कायद्याच्या विरोधात आहे. पॉक्सो कायद्याच्या कलम २३ नुसार कोणत्याही अल्पवयीन बलात्कार पीडितेचे नाव, पत्ता, फोटो, कौटुंबिक तपशील, शाळा, परिसर आणि इतर गोष्टी उघड करता येत नाहीत.