मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राच्या राजकारणात आज राष्ट्रवादीचे आर.आर. आणि आर हिट ठरलेत. सुपर हिट ठरलेत. एक आर.आर. म्हणजे अर्थातच महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री आर.आर.आबा पाटील यांचे सुपुत्र रोहित आर. पाटील. त्यांनी सर्व पक्ष विरोधात एकवटलेले असतानाही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसला संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या कवठेमहांकाळ नगरपंचायतीमध्ये रोहित आर आर पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दणदणीत विजय मिळवला आहे. १७ पैकी १० जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे आर म्हणजे आमदार रोहित पवार. नगरमधील कर्जत जामखेडमधून पहिल्यांदाच विधानसभेत पोहचलेल्या रोहित पवारांनी त्यांच्या पक्षाला प्रथमच कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून दिला आहे. तिथं त्यांनी भाजपाचे माजी आमदार राम शिंदे यांचा सणसणीत पराभव केला आहे.
प्रचारातील भाषणात जे बजावलं ते रोहित पाटलांनी विजय मिळवून करुन दाखवलं!
- कवठेमहांकाळ नगर पंचायत निवडणुकीमध्ये रोहित पाटलांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी झाली होती.
- माजी खासदार संजय काका पाटील, शिवसेनेचे नेते माजी मंत्री अजित घोरपडे, राष्ट्रवादीचा एक गट आणि काँग्रेस अशी शेतकरी विकास आघाडी रोहित पाटलांच्या विरोधात होती.
- अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीमध्ये रोहित पाटील यांनी बाजी मारली आहे.
- कवठेमहांकाळ नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे.
- रोहित पाटील यांनी या निवडणुकीमध्ये स्वतः प्रचाराची धुरा सांभाळली होती.
रोहित पाटील : २३व्या वर्षी नगरपंचायत जिंकणारा तरूण नेता!
कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या आज जाहीर झालेल्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा मिळाल्या.
“हा कवटेमहांकाळच्या सर्वसामान्य माणसांचा विजय आहे, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मला आशिर्वाद आणि मार्गदर्शन केलं आहे,” अशी प्रतिक्रिया रोहित पाटील यांनी विजयानंतर दिली आहे.
पक्षाबरोबर कुणी राहायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया रोहित यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या गटबाजीबाबत दिली आहे.
“सगळे पक्ष एकाबाजूला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते दुसऱ्या बाजूला. तुम्ही म्हणाला २५ वर्षांच्या तरुणाला हरवण्यासाठी सगळे एकवटले आहेत. पण माझं वय २३ वर्षे आहे. २५पर्यंत कोणाला शिल्लक ठेवत नाही.” असे ठणकावून सांगणारं रोहित पाटील यांचं प्रचारातलं भाषण गाजलं होतं.
नगरच्या कर्जतमध्येही राष्ट्रवादीचा ‘आर’ फॅक्टर सुपरहिट!
नगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीत १७ पैकी १२ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. पहिल्यांदाच राष्ट्रवादीने तेथे विजय मिळवतानाच एक हाती सत्ता आणली आहे. तर भाजपने दोन जागा जिंकल्या आहेत. कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे राम शिंदे यांच्यात जोरदार अटीतटीची लढाई होती. मात्र, आमदार रोहित पवार यांनी माजी आमदार राम शिंदेंना विधानसभेप्रमाणेच जोरदार धक्का दिला. उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही त्यांचे खास कौतुक केले. जेथे उमेदवार नव्हते तेथे यावेळी विजय मिळवला. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
कर्जत नगरपंचायतीत राष्ट्रवादीला १७ पैकी १२ जागा मिळाल्या आहेत. सत्ताधारी भाजपला फक्त दोन जागा मिळवता आल्या आहेत.