मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आजारपणाविषयी सोशल मीडियावर हीन दर्जाच्या पोस्ट करणाऱ्या विकृतांवर कारवाई करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने सायबर क्राईम विभागात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे यांनी दिली आहे. अतिशय गलिच्छ विकृत विखार पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विकृतांविरोधात कारवाई झाल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचा इशारा वर्पे यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे यांचे निवेदन:
“आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार सध्या आजारी आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रियेची गरज असल्याने त्यांना मुंबई येथील ब्रीचकॅडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आदरणीय साहेब तिथे उपचार घेत असून , सर्व उपचारांना ते अतिशय उत्तम प्रकारे प्रतिसाद देत आहेत. जी आमच्यासाठी तसेच आदरणीय साहेबांच्या वर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. अनेक विकृत मंडळी आदरणीय साहेबांच्या आजारपणाबाबत अतिशय विकृत आणि हीन दर्जाच्या पोस्ट्स सोशल मीडियावर पोस्ट करत होती.
गेली ५० वर्ष या राज्याचा भार समर्थपणे वाहणाऱ्या आणि आमच्यासाठी आमचा मान , स्वाभिमान असणाऱ्या साहेबांच्यावर केलेली ही विखारी टीका अतिशय जिव्हारी लागणारी होती. परिणामी आम्ही मुंबई येथे आदरणीय साहेबांच्या विरोधात विकृत लिखाण करणाऱ्या लोकांच्या विरोधात सायबर क्राईमला गुन्हे दाखल केले आहेत.
सदर गुन्ह्याचा तपास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत सांगवी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून करण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड सायबर पोलीस सेलचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. संजय तुंगर, तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय भोसले, पोलीस उप निरीक्षक एस के गवारी या पोलीस अधिकाऱ्यांच्या टीमशी सदर गुन्ह्याबाबत मी फिर्यादी म्हणून नियमित संपर्कात असून त्यांच्याशी आज झालेल्या चर्चेतून, पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती मिळाली आहे. सदर आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम १५३ अ, ४६९, ४९९, ५००, ५०४, ५०५/२ व ३४ या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आतापर्यंत आम्ही खूप शिस्तीत भूमिका घेत सोशल मीडियावर व्यक्त होत होतो, आहोत. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने नेहमी सामाजिक जाणीवेतून समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांना वेळोवेळी मदतीची, राष्ट्रहिताची व सहकार्याची भूमिका घेतली आहे. पण यापुढे मात्र आदरणीय साहेबांच्या वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही नेत्याने कार्यकर्त्यावर मर्यादा सोडून टीका केली तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हेआज येथे मी आपल्या सर्वांच्या साक्षीने ग्वाही देतो.