मुक्तपीठ टीम
भाजप ही वॉशिंग मशीनसारखी झाली आहे. इथे डाकू पण साधू होवू शकतो असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना लगावला.
नारायण राणे हे कॉंग्रेसमध्ये असताना त्यांच्या परेल येथील एका इमारतीला ईडीने नोटीस दिल्याच्या बातम्या भाजपने पेरल्या होत्या. याशिवाय नारायण राणे अमित शहा यांना अहमदाबाद येथे भेटून आल्याचा व्हिडीओ राणे यांनी नकार दिल्यावर भाजपच्या लोकांनी व्हायरल केला होता.त्याचपध्दतीने बंगालमध्ये भाजपने लोक घेतले होते. म्हणजे ईडी, सीबीआय व इतर यंत्रणांच्या दबावाखाली आमच्या पक्षात या अशी परिस्थिती भाजप निर्माण करत आहे. त्यांच्या पक्षात गेल्यावर चौकशा बंद होतात. ही सत्य परिस्थिती आहे. नितीन गडकरीही वाल्या कोळयाचा वाल्मिकी करण्याची ताकद भाजपमध्ये असल्याचे बोलले होते याची आठवण नवाब मलिक यांनी करुन दिली.
शरद पवार यंनाही ईडीची नोटीस आली होती मात्र ती परत घेण्यात आली. २०१९ मध्ये राष्ट्रवादीने ईडीच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढाई केली. त्यामुळे आमचे नेते किंवा कार्यकर्ता अशा नोटीसीला आणि कारवाईला घाबरणार नाही असा स्पष्ट इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.
आमचे नेते ज्या एजन्सीने कारवाई केलीय त्यांना सहकार्य करत आहेत. आमच्या नेत्यांनी चुकीचं काही केलेलं नाही. मात्र केंद्रीय एजन्सीचा दुरुपयोग केला जातोय. या चौकशा थांबवा हे सांगण्यासाठी आमचा कोणताही नेता मोदी-शहा यांची भेट घेत नसल्याचेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.