मुक्तपीठ टीम
भाजपचे नेते त्यांच्या स्वत:च्या राजकीय हेतूसाठी काश्मीर फाइल्सचा प्रचार करण्यात व्यस्त आहेत अशा परिस्थितीत काश्मिरी हिंदू आणि पंडितांच्या जीवाचे रक्षण करण्यात मोदीसरकारचे गृहमंत्री अमित शहा पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.
देशाचे गृहमंत्री या नात्याने देशातील नागरिकांच्या जीविताचे रक्षण करणे हे अमित शहा यांचे कर्तव्य आहे असेही महेश तपासे म्हणाले.
काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा बंडखोरी होऊन नागरिकांना लक्ष्य करणे हे खोऱ्यातील गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे. अमित शहा यांनी वैयक्तिकरित्या सर्व काश्मिरी नागरिकांच्या सुरक्षेची हमी घ्यावी अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने काश्मिरी पंडितांना खोऱ्यात सुरक्षित परतण्याचे आश्वासन दिले होते, परंतु काश्मिरी पंडितांना त्यांच्या मायभूमीत पुनर्स्थापित करण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न न केल्याने तीच आश्वासने आणखी एक जुमला ठरली आहे अशी खोचक टीकाही महेश तपासे यांनी केली.
विस्थापित काश्मिरी पंडितांना सुरक्षित रस्ता दाखवणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य होते, तर भाजपने केवळ त्यांच्या भावनांशी खेळ केला.भाजपने धर्म आणि जातीवर आधारीत राजकारण सोडले पाहिजे आणि भारतातील नागरिकांची सुरक्षा, उपजिविका आणि समानता सुनिश्चित केली पाहिजे, असेही महेश तपासे म्हणाले.