मुक्तपीठ टीम
भाजपा नेते किरीट सोमय्यांनी आक्रमक भूमिका घेत पुढील लक्ष्य म्हणून उल्लेख केलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर साखर कारखाना आता खरेदी करून पुन्हा सहकारी करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंकेंच्या पुढाकाराने सुरु झालेल्या खरेदी प्रयत्नांना कारखान्याच्या खासगी मालकांकडूनही घेतला त्याच किंमतीला विकण्याची तयारी दाखवत सहकार्य मिळत असल्याची चर्चा आहे. मात्र, विक्रीनंतर खासगीचा पुन्हा सहकारी करण्याच्या या खरेदी व्यवहारानंतरही ईडीची कारवाई, न्यायालयाचा दट्टा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे किरीट सोमय्यांची आक्रमकता टाळता येणार का, हा महत्वाची मेख आहे.
पारनेर साखर कारखान्याचं प्रकरण आहे तरी काय?
- महाराष्ट्रातील ४९ सहकारी कारखाने खासगी कंपन्यांना विकताना झालेल्या गैरप्रकारांच्या आरोपांसंबंधी अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीकडून कारवाई सुरू आहे.
- राज्यातील चौकशी सुरु झालेल्या किंवा होणाऱ्या ४९ कारखान्यांपैकीच एक म्हणजे अहनमदनगरच्या पारनेरमधील साखर कारखाना आहे.
- पारनेर तालुक्यातील हा साखर कारखाना मूळचा पारनेर सहकारी साखर कारखाना आहे.
- कर्जफेडीसाठी जे साखर कारखाने लिलाव केल्यासारखे दाखवत विकण्यात आले त्यात हा साखर कारखाना पुणे जिल्ह्यातील एका राजकीय नेत्याच्या अधिपत्याखालील खासगी कंपनीने विकत घेतला आहे.
- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि इतरांनी ज्या याचिका दाखल केल्या, त्यामध्ये विक्रीत गैरप्रकार झालेल्या ४९ कारखान्यांच्या यादीत पारनेरच्या या कारखान्याचाही समावेश आहे.
भाजपाचचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चौकशीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना जे पत्र पाठविले, त्यात दिलेल्या यादीतही या कारखान्याचे नाव आहे.
ईडी कारवाईची पिडा टाळण्यासाठी खासगीचा सहकारी करण्याचा उलटा प्रयत्न?
- आधी अण्णा हजारेंनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर या प्रकरणाची संबंधितांकडून फारशी गंभीर दखल घेतली गेली नव्हती.
- भाजपाने या प्रकरणी चौकशीच्या हालचाली सुरु करताच मात्र कारखान्यासंदर्भात नगरच्या राजकारण्यांकडून वेगळ्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंकेंकडून खासगीचा सहकारी करण्याचा प्रयत्न
- खासगी कंपनीला विकण्यात आल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला हा कारखाना परत विकत घेऊन तो सहकारी करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
- त्यासाठी पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी पुढाकार घेतला आहे.
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचेही आमदार लंकेंना कारखाना पुन्हा खरेदीसाठी सहकार्य केले जात असल्याची माहिती मिळाली.
- सत्तेतील ज्येष्ठ नेत्यांनीच मध्यस्थी केल्याने तो विकत घेणाऱ्या क्रांती शुगर व्यवस्थापनानेही घेतल्या किमतीला हा कारखाना परत देण्याची तयारी ठेवली असल्याचीही माहिती मिळाली आहे.
- सहकारीचा खासगी झाल्यानंतर अण्णा हजारेंनी सुरु केलेली न्यायालयीन प्रक्रिया आणि आता भाजपामुळे ईडीच्या कारवाईची टांगती तलवार असल्याने कारखाना विकत घेणारी कंपनीही हा कारखाना परत विकण्याची तयारी आहे.
कारखाना विक्रीविरोधात लढणारेही साथ देण्यास तयार
- साखर कारखाना विकत घेऊन पुन्हा सहकारी करण्याच्या आमदार लंकेंच्या प्रयत्नांचे पारनेर मतदारसंघातूनही स्वागत केले जात आहे.
- पारनेर कारखाना बचाव समिती स्थापन करून याचिका करणारे स्थानिक नागरिक रामदास घावटे आणि बबनराव कवाद यांनीही या खरेदी प्रयत्नांचे स्वागत केले आहे.
- खासगीचा पुन्हा सहकारी झाला तर कारखाना पुन्हा शेतकऱ्यांच्या मालकीचा होणार असेल तर बचाव समितीतर्फे दाखल करण्यात आलेली याचिका मागेही घेतली जाऊ शकते.
सोमय्यांची आक्रमकता, ईडीची कारवाई, न्यायालयाचा दट्टा टाळता येणार?
- जर खरोखरच आमदार निलेंश लंकेंच्या पुढाकाराने आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या सहकार्यामुळे खासगीतून पारनेर साखर कारखाना पुन्हा सहकारी झाला तर नवा इतिहास घडेल.
- त्यामुळे आर.आर.पाटील यांच्यासारखे जनतेतील नेतृत्व म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस ज्यांना मोठं करू पाहत आहे, त्या आमदार लंकेंचाही मतदारसंघातील पाया विस्तारणार आहे.
- त्याचबरोबर न्यायालयीन सुनावणीत फायदा होण्याबरोबरच ईडी चौकशीतून, भाजपाच्या आरोपसत्रातून सुटका होईल, असेही मानले जाते.
- पण, कारखाना पुन्हा खरेदी केला गेला तरी आधीच्या विक्री व्यवहारातील आरोप झालेले गैरव्यवहार ईडी किंवा न्यायालयाकडून नजरेआड केले जातील, याची खात्री देता येत नाही.
- विशेषत: भाजपापेक्षाही जास्त आक्रमकतेने सध्या लढणारे किरीट सोमय्या शांत बसतील का, अशी शंका घेण्यात येत आहे.
- कारण आता पारनेर साखर कारखाना खासगीचा सहकारी करण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कारखाना, सरकार आणि राज्य बँकेवर वर्चस्व असतानाच विक्रीचाही व्यवहार करण्यात आला होता.
- त्यामुळे भाजपा केवळ व्यवहार फिरवला म्हणून राष्ट्रवादीला अडचणीत आणणाऱ्या प्रकरणात थंड बसेल का?
सोमय्यांनी प्रोमो चालवला, जरंडेश्वरनंतर आता पारनेर! पुन्हा राष्ट्रवादी लक्ष्य!