मुक्तपीठ टीम
ट्विटर इंडियाने त्यांची ब्लॉक पॉलिसी नेमकी काय आहे हे जाहीर करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
ट्विटरने कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी व कॉंग्रेसच्या अन्य नेत्यांची ट्विटर हँडल ब्लॉक केली असून नवाब मलिक यांनी ट्विटरच्या भूमिकेवर शंका निर्माण केली आहे.
मागील काही दिवसापूर्वी ट्विटर व केंद्रसरकारमध्ये वाद उफाळून आला होता. त्यानंतरच विरोधी पक्षांच्या नेत्यांची ट्विटर हँडल ब्लॉक होत आहेत आणि हे दबावाखाली होत आहे, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.
कोणत्या गोष्टींसाठी आणि कोणत्या कारणांसाठी हँडल आणि पोस्ट ब्लॉक करणार आहे आणि किती दिवसांसाठी व त्यांच्या कक्षेत जी – जी ट्विटर हँडल येतील त्या सर्वांवर कारवाई करणार का? याबाबतची पॉलिसी ट्विटर इंडियाने स्पष्ट करावी अन्यथा केंद्रसरकारच्या दबावाखाली ट्विटर काम करतंय ही जनतेची शंका अजून वाढेल असेही नवाब मलिक म्हणाले.