मुक्तपीठ टीम
त्रिपुरात न घडलेल्या घटनेवरून महाराष्ट्रात प्रत्यक्षात हिंसाचार भडकला. शुक्रवारी मुसलमान वस्त्यांमध्ये घडलेल्या हिंसाचारानंतर शनिवारी अमरावतीत भाजपाशी संबंधित जमावाने तोडफोड केली. या हिंसाचारानंतर आता महाराष्ट्रात फोटोंचं राजकारण भडकलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांच्या फोटो आरोपाला उत्तर देताना भाजपाचे नेते आशिष शेलारांनी दिलेले उत्तर भविष्यात फोटोकारण वेगळ्या वळणावर जाण्याचा धोका दाखवणारे आहे.
“आशिष शेलार रझा अकादमीच्या कार्यालयात काय करत होते?” – नवाब मलिक
गेल्या शुक्रवारी काही मुसलमान वस्त्यांमध्ये झालेल्या हिंसाचारामागे रझा अॅकेडमी असल्याचा आरोप झाला आहे. मात्र, कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी दावा केला की रझा अकादमीकडे संपूर्ण राज्य बंद ठेवण्यासाठी पुरेसे संख्याबळ नाही. मात्र, त्यांचे काही मौलाना राजकीय पक्षांच्या कार्यालयात नक्कीच फिरत असतात. त्याचवेळी त्यांनी भाजपा नेते आशिष शेलारांचा काही मौलानांसोबतचा फोटो दाखवत आशिष शेलार रझा अकादमीच्या कार्यालयात काय करत होते, असा सवाल विचारला. अप्रत्यक्षपणे महाराष्ट्रातील हिंसाचारासाठी त्यांनी भाजपावर आरोप केला.
नवाब मलिक पुढे म्हणाले की, महाराष्ट्र दंगलीनंतर आता रझा अकादमीची भूमिकाही महाराष्ट्र पोलिस तपासत आहेत. दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.
महाराष्ट्राचे गृह विभाग संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे. त्याचबरोबर दंगल घडवून आणणाऱ्यांची धरपकड सुरू झाली आहे. एखादा नेताही दोषी असेल तर त्यालाही सोडले जाणार नाही.
“आम्ही फोटो दाखवले तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही” – आशिष शेलार
या आरोपानंतर भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार पुढे सरसावले . त्यांनी मलिकांच्या फोटो आरोपाला प्रत्युत्तर दिले.
काय म्हणाले आशिष शेलार?
- नवाब मलिक यांना मी मराठीतील ती म्हण पुर्ण सांगणार नाही पण तुमची खोड काही जात नाही, एवढे मात्र खरे.
- अशा पद्धतीने दरवेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या फोटोंच्या जीवावर अफवांचे राजकारण करणं हा तुमचा धंदा आहे.
- पण त्रिपुराच्या घटनेनंतर महाराष्ट्रात घडलेली दंगलींचा आणि सन २०१६-२०१७च्या फोटोचं संबंध काय?
- माझ्या या फोटोचा रझा अकादमीच्या फोटोशी संबंध काय?
- ही बैठक रझा अकादमीच्या कार्यालयात झालेली नाही.
- जुन्या कुठल्यातरी फोटोचा दाखला देऊन आजच्या दंगलीमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारच्या अपयशाला लपवण्याचे काम तुम्ही करू नका.
- तुमची खोड जात नसेल तर असे असंख्य फोटो रझा अकादमी सोबतचे आम्हाला दाखवावे लागतील, तेव्हा तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही.
- महाराष्ट्र विकास आघाडीने आणि राष्ट्रवादीने हे फोटोचं राजकारण बंद करावे.