मुक्तपीठ टीम
भारताच्या नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस वेला’ या पाणबुडीचा समावेश झाला आहे. ती पराक्रम दाखवेल. या पाणबुडीमध्ये आरमारी कारवायांचा (ऑपरेशन्स) संपूर्ण स्पेक्ट्रम हाती घेण्याची क्षमता आहे. ही पाणबुडी ‘शक्तिशाली माध्यम’ आहे, असेही नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
आजची गतिमान आणि गुंतागुंतीची सुरक्षा परिस्थिती पाहता, ‘वेला’ची क्षमता आणि शक्ती हिंदी महासागर क्षेत्राच्या सीमा ओलांडून भारताच्या सागरी हिताचे संरक्षण, प्रचार आणि जतन करण्याच्या नौदलाच्या क्षमतेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल आणि आमच्या शत्रूंना ‘स्पष्ट प्रतिबंधक’म्हणून काम करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
चीनी नौदलावर बारकाईनं लक्ष!
हिंदी महासागर क्षेत्रातील चिनी नौदलाच्या कारवायांसंबंधी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात, अॅडमिरल सिंग म्हणाले की, ते सन २००८ पासून एडनच्या आखातामध्ये चाचेगिरी विरोधी गस्तीसाठी कार्यरत आहेत. त्यांच्या पाणबुड्या नियमित अंतराने भारतीय सागरी क्षेत्रात (आयओआर) आल्या आहेत. आत्तापर्यंत, बहुतेक चीनच्या संशोधन नौका आणि त्यांची सर्वेक्षण जहाजे यावर केंद्रीत आहेत. आम्ही त्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत, असेही नौदल प्रमुख म्हणाले.
अमेरिकेकडून भाडेतत्वावर घेतलेल्या सी गार्डियन ड्रोनसह ‘पी ८ आय’ ही सागरी पाणबुडीविरोधी गस्ती विमाने भारतासाठी खरी शक्तिगुणक ठरली आहेत, असेही त्यांनी सांगितले. पी ८ आय आणि सी गार्डिअन्स ड्रोन्स हिंदी महासागर प्रदेशात अतिशय बारकाईने लक्ष ठेवून आहेत. कारण त्यांची पोहोच आणि दीर्घकाळापर्यंत एखाद्या क्षेत्रात टिकून राहण्याची क्षमता आहे, असे अॅडमिरल करमबीर सिंग यांनी सांगितले.
निवृत्तीपूर्वी दोन शक्तीकेंद्रांच्या समावेशाचा बहुमान
- करमबीर सिंग २९ नोव्हेंबरला होणार निवृत्त
- करमबिर सिंग येत्या २९ नोव्हेंबरला सेवानिवृत्त होणार आहेत.
- निवृत्तीआधी ‘आयएनएस विशाखापट्टणम्’ ही अत्याधुनिक विनाशिका आणि ‘आयएनएस वेला’ ही अत्याधुनिक पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात कमिशन्ड करण्याचा बहुमान मिळाला आहे.
- ही पाणबुडी आकाराने जगातील सर्वाधिक लहान, तरीही हल्ला करु शकणारी आहे.
- तिचा वेग ताशी कमाल २० ते २२ सागरी मैल आहे.
लिंक क्लिक करा आणि वाचा: ‘आयएनएस वेला’ पाणबुडीवरील १८ पाणतीरांच्या सुसज्जतेमुळे शत्रूंच्या छातीत धडकी!