मुक्तपीठ टीम
दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच निर्बंधमुक्त नवरात्रौत्सव साजरी होत असल्याने सगळीकडे उत्सवाचं वातावरण आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेले श्री. करवीर निवासिनी अंबाबाईच्या नवरात्रौत्सव सोहळ्याची तयारीही यावेळी जय्य्त करण्यात आली आहे. दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त नवरात्र उत्सव साजरा होत असल्याने भाविकांसह व्यापाऱ्यांमध्ये आनंदी वातावरण आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई ने व आकर्षक रंगरंगोटी ने परिसर उजळून निघाला. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी ८५ हजारांवर भाविकांनी देवीचे दर्शन घेतले.
कोल्हापुरात श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. या नऊ दिवसाच्या नवरात्री उत्सवात श्री अंबाबाईला विविध रूपामध्ये दाखवण्यात येत असते. पहिल्या दिवशी म्हणजेच अश्विन शुद्ध प्रतिपदेला श्री अंबाबाई मंदिरामध्ये घटस्थापना करण्यात आली. तसंच श्री अंबाबाईला सिंहासनाधीश्वरी या रूपात साकारण्यात आली होती. मंदिराला यंदा आकर्षक रोषणाई करण्यात आल्याने शिखरांसोबत मंदिरावरील शिल्प सुद्धा उजळून निघाली. पहिल्या दिवशीच्या पालखी सोहळ्याला भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिर परिसरात होणारी गर्दी व सुरक्षेसाठी ड्रोनसह १६० कॅमेरे बसवून मंदिरांमध्ये तयारी पूर्ण झाली आहे. बाहेरील राज्यातून येणाऱ्या भाविकांची दर्शन व्यवस्था व्यवस्थित होण्यासाठी दर्शन रांगेसाठी मंडप उभारण्यात आला आहे . तसेच पोलीस ,होमगार्ड व देवस्थान सुरक्षा स्टाफ ही तैनात करण्यात आले आहेत.
पहिल्या दिवशीची पूजा सिंहासनाधीश्वरी या रूपात साकारली!!
- नवरात्र म्हणजे फक्त देवीचा आनंद उत्सव नसतो तर स्वतःच्या आत्मिक शक्तीला जागे करण्याचे एक महत्त्वाचे पर्व. हे अनुष्ठान आहे.
- अनुष्ठानाची पहिली पात्रता म्हणजे स्थिरता.
- ही स्थिरता येण्यासाठी आसनस्थ असणं गरजेचं असतं आणि इथं अनुष्ठानं तर श्रीमद सिंहासनेश्वरीचे आहे. भगवतीच्या अनेक नावांपैकी एक हे ललिता सहस्त्रनामातील देवीचे नाव.
- साधारणपणे माणसाच्या विभूतीच्या नावाआधी श्री हे उपपद लागतं.
- परंतु देवीच्या सिंहासनाच्या नावाआधी श्री उपाधी लावली जाते.
- याचं कारण ती ज्या आसनावर विराजमान आहे ते आसनच मुळात सृष्टीच्या उत्पत्ती स्थिती लयाचे कर्ते असणाऱ्या त्रिदेवांच्या आधाराने तयार झाले आहे.
- त्यामुळे जगदाद्य शक्ती अशी करवीर निवासिनीच्या पहिल्या दिवशीची पूजा सिंहासनाधीश्वरी या रूपात साकारली आहे.