मुक्तपीठ टीम
पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ३३ वर्षे जुन्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नवज्योतसिंग सिद्धू यांना सुनावलेल्या शिक्षेवर फेरविचार करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर २५ मार्च रोजी दुपारी २ वाजता सुनावणी होणार आहे. त्या प्रकरणात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू ओढवला होता. उच्च न्यायालयातील शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने फक्त दंडावर भागवली होती. पण आता त्यांच्या नातेवाईकांच्या मागणीनुसार सर्वोच्च न्यायालयात दंडावर भागवण्याच्या निकालावर पुनर्विचाराची शक्यता आहे. जर दंडावर भागवण्याच्या निकालाचा सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार केला तर सिद्धूंसाठी नवं संकट निर्माण होईल.
न्यायमूर्ती एएम खानविलकर यांच्या विशेष खंडपीठासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी आहे. न्यायमूर्ती खानविलकर म्हणाले की, विशेष खंडपीठ शुक्रवारी दुपारी २ वाजता पुनर्विलोकन याचिकेवर सुनावणी करेल. खंडपीठ उर्वरित काम हाताळत आहे. २५ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धू यांना या याचिकेवर दोन आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले होते.
काय आहे ३३ वर्षांपूर्वीचे प्रकरण?
- हे प्रकरण १९८८ सालचे आहे.
- जेव्हा सिद्धू क्रिकेटर होते.
- २७ डिसेंबरच्या संध्याकाळी सिद्धू त्यांचा मित्र रुपिंदर सिंग संधूसोबत पटियाला येथील शेरावले गेट मार्केटमध्ये गेले होते.
- त्याच मार्केटमध्ये कार पार्कींगवरून ६५ वर्षीय गुरनाम सिंग यांच्याशी त्यांचे भांडण झाले.
- हे प्रकरण हाणामारीत पोहोचले होते.
- सिद्धूने गुरनाम सिंग यांना गुडघ्यावर पाडले होते.
- त्यानंतर गुरनाम सिंग यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला.
- त्याच दिवशी सिद्धू आणि त्याचा मित्र रुपिंदर यांच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात सदोष मनुष्य हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
- हे प्रकरण सत्र न्यायालयात गेले जे १९९९ मध्ये निकाली काढण्यात आले.
उच्च न्यायालयाने दिलेली शिक्षा, सर्वोच्चमध्ये संपली!
- पण डिसेंबर २००६ मध्ये उच्च न्यायालयाने निर्णय देत सिद्धू आणि संधूला दोषी ठरवले आणि १ लाख रुपयांच्या दंडासह ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
- उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.
- २०१८ मध्ये, सिद्धू यांचा खटला भाजपाचे दिवंगत नेते अरुण जेटली यांनी लढवला आणि सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली.
- सिद्धू आणि संधू यांची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आणि सिद्धूला १,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
- या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती पुनर्विचार याचिकेत करण्यात आली आहे.