मुक्तपीठ टीम
एका दिवसात लाखो रुपये कमावणारे पंजाब काँग्रेसचे माजी प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांना पटियाला तुरुंगात आता दिवसाला केवळ ३० ते ९० रुपयेच कमावता येणार आहेत. एवढेच नाही तर, त्यांना पहिले तीन महिने पगाराविना तुरुंगात काढावे लागणार आहेत. याचाच अर्थ सिद्धूंना तीन महिने तुरुंगात काम करावे लागेल पण त्याबदल्यात त्यांना पगार मिळणार नाही.तुरुंगाच्या नियमांनुसार कठोर कारावासाची शिक्षा झालेल्या सिद्धूंना अकुशल मानण्यात आले असून सुरुवातीच्या तीन महिन्यांचे काम हे प्रशिक्षण म्हणून मानले जाईल.
काय होते प्रकरण?
२७ डिसेंबर १९८८ च्या संध्याकाळी सिद्धू आणि त्यांचा मित्र रुपिंदर सिंह संधूसोबत पटियालाच्या शेरवाले गेट मार्केटमध्ये पोहोचले. मार्केटमध्ये पार्किंगवरून ६५ वर्षीय गुरनाम सिंह यांच्यासोबत त्यांचा वाद झाला. प्रकरण हाणामारीत पोहोचले. यादरम्यान सिद्धूंनी गुरनाम सिंह यांना धक्काबुक्की केली. गुरनाम सिंह यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला.
सिद्धूंच्या तुरुंगातील जीवनशैलीतही बदल होणार आहे. विशेषत: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रंगीबेरंगी ड्रेसिंग स्टाइलमुळे चर्चेत आलेल्या सिद्धूंना तुरुंगात पांढरे कपडे घालावे लागणार आहेत. तुरुंगाच्या नियमांनुसार शिक्षा झालेल्या कैद्यांना पांढरे कपडे घालणे बंधनकारक आहे. त्याचवेळी, सूत्रांच्या माहितीनुसार, सिद्धू शिक्षित असल्यामुळे तुरुंगाच्या कारखान्यात त्यांना काम दिले जाऊ शकते, जिथे बिस्किटे आणि फर्निचर बनवले जातात. त्यांना तुरुंगातील ग्रंथालय किंवा कार्यालयातही काही काम मिळू शकते. तीन महिने पगाराशिवाय काम केल्यानंतर सिद्धूंना आधी अर्धकुशल कैदी समजले जाईल आणि या काळात त्यांना कामासाठी ३० रुपये दिले जातील. यानंतर कुशल कैदी बनून रोज ९० रुपये कमवू शकतील.
तुरुंगातील सिद्धूंची रोजची असणार ‘ही’ दिनचार्या
- सिद्धूंचा तुरुंगातील दिवस पहाटे ५.३० वाजता सुरू होईल.
- यानंतर, त्यांना ७ वाजता चहासोबत खायला बिस्किटे किंवा काळे हरभरे मिळू शकतात.
- त्यांना सकाळी ८.३० वाजता नाश्त्यासाठी चपाती, डाळ, भाजी मिळेल.
- त्यानंतर तुरुंगातील इतर कैद्यांप्रमाणे त्यांना कामासाठी नेले जाईल.
- संध्याकाळी ५.३० वाजता ते सुटतील. संध्याकाळी ६.३० वाजता रात्रीचे जेवण दिले जाईल आणि नंतर ७.१५ च्या सुमारास इतर कैद्यांप्रमाणे त्यांनाही बॅरॅकमध्ये बंद केले जाईल.
- मिळालेल्या माहितीनुसार, नियमांनुसार सिद्धूंना चार महिने तुरुंगात घालवावे लागणार आहे, मात्र या काळात त्यांचे वर्तन चांगले असल्यास कारागृह अधिक्षक त्ंयाची पेरोलसाठी शिफारस करू शकतात. त्यांना २८ दिवसांपर्यंत पेरोल मंजूर केला जाऊ शकतो.