मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४६ आघाडीच्या स्टार्टअप्सचा नुकताच गौरव केला. भारतभरातील १५० स्टार्टअप्स आणि त्यांचे गुंतवणूकदार त्या व्हर्च्युअल मिटिंगमध्ये सहभागी होते. सर्वात महत्वाचं म्हणजे त्यात पुण्यातील अत्रेया इनोव्हेशन्स प्रा.लि., रिपोज आयओटी इंडिया प्रा. लि., पिवोटचेन सोल्यूशन्स टेक्नॉलॉजीज प्रा. लि. आणि उड चलो या ट्रॅव्हल अॅपवाल्या अपक्यूअर बिझनेस सर्व्हिसेस प्रा. लि. या चार स्टार्टअप्सचा समावेश होता. त्यातही ‘उड चलो’ची संकल्पना व्यवसायाबरोबरच देशाच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या सेनादलांसाठीचा प्रवास-पर्यटन सुकर करण्याची असल्याने चर्चेचा विषय ठरली. सेनादलातील जवानांना ग्राहक उत्पादने आणि सेवांचा लाभ मिळवून देण्यासाठी गेली ९ वर्षे उडचलोतर्फे अनोखे सुलभ आणि प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. सध्या दरवर्षी सशस्त्र सेना दलांतील सुमारे १६ लाख कर्मचारी उडचलोच्या माध्यमातून तिकिटांचे आरक्षण करत असतात.
‘उड चलो’ वेगळी संकल्पना असल्याने गौरव
- प्रवास श्रेणीमध्ये केवळ तीनच स्टार्टअप्सना सन्मानित करण्यात आले.
- प्रवास नियोजन आणि संशोधन श्रेणीतील सर्वात नाविन्यपूर्ण आणि सामाजिकदृष्ट्या प्रभावी स्टार्टअप म्हणून ‘उडचलो’ला पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
- सशस्त्र सेना दलांसाठी (आर्म्ड फोर्सेस) प्रवासाचे आरक्षण करणारी उडचलोची सुलभ आणि सुकर इंटरफेस सुविधा ही या श्रेणीमधील सर्वात आगळी आणि उल्लेखनीय होतील.
- सेनादलातील जवानांना ग्राहक उत्पादने आणि सेवांचा लाभ मिळवून देण्यासाठी गेली ९ वर्षे उडचलोतर्फे अनोखे सुलभ आणि प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे.
- सध्या दरवर्षी सशस्त्र सेना दलांतील सुमारे १६ लाख कर्मचारी उडचलोच्या माध्यमातून तिकिटांचे आरक्षण करत असतात.
उडचलो चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी कुमार म्हणाले, “भारतातील सशस्त्र सेना दलांप्रती (आर्म्ड फोर्सेस) आमच्या मनात असलेल्या प्रचंड आदर आणि कृतज्ञतेच्या भावनेतून आम्ही उडचलोची स्थापना केली. या समुदायाने आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या देशासाठी कितीतरी त्याग केलेला आहे. एक स्टार्टअप या भूमिकेतून आम्ही केवळ एक छोटासा बदल घडवून आणण्याचा विचार करू शकतो, ज्यामुळे त्यांच्या जीवनात फरक पडू शकेल. या देशाचे भवितव्य म्हणून ओळख मिळणे आणि अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून काम करता येणे ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. हा पुरस्कार मिळाल्यामुळे उडचलो च्या संपूर्ण टीमवर प्रचंड मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे आणि भारताच्या अर्थव्यवस्थेच्या आणि व्यावसायिक वृद्धीच्या दृष्टीने एक स्टार्टअप या नात्याने आपण नक्कीच परिणामकारक प्रभाव पडू शकू याबाबत आम्ही आशावादी आहोत.”
मंत्रालयाकडे या पुरस्कारांसाठी ४९ विविध उपश्रेणींत मिळून २१७७ हून जास्त अर्ज आले होते. त्यापैकी एकूण १७५ स्टार्टअप्सचे अर्ज अंतिम फेरीपर्यंत पोचले आणि नाविन्य, प्रमाणता, सामाजिक-आर्थिक आणि पर्यावरणाशी संबंधित प्रभाव, समावेशकता आणि वैविध्यपूर्णता यांच्या आधारे या अर्जांचे परीक्षण करण्यात आले.