मुक्तपीठ टीम
शिक्षक हा कायम २४ तास शिक्षकच असतो, असं म्हणतात. नगरचे शिक्षक शहाजान शेख अशांपैकीच शाळेत मुलांना शैक्षणिक अभ्यासक्रम शिकवूनच ते थांबत नाहीत तर आपल्या देशाच्या राष्ट्रीय प्रतीकांच्या सन्मान जपवणुकीसाठी सतत प्रयत्न करतात. भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा, सत्यमेव जयते ब्रीदवाक्य तसेच भारतीय राष्ट्रगीत व अन्य राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान राखण्यासाठी ते अविरत प्रयत्न करतात. आजवर त्यांना त्या कार्यासाठी अनेक संस्थांनी गौरवले आहे. सर फाऊंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे त्यांना नॅशनल इनोव्हेशन अॅवार्ड लोणावळा येथे देण्यात आले.
नवोपक्रमशील शिक्षकांचे एक अग्रगण्य नेटवर्क
- सर फाउंडेशन हे देशातील नवोपक्रमशील शिक्षकांचे एक अग्रगण्य नेटवर्क आहे.
- सोलापूरमधून चालणाऱ्या स्टेट इनोवेशन अँड रिसर्च फाउंडेशनला सर फाउंडेशन म्हणून ओळकले जाते.
- संस्थेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तर शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा २०२०चा निकाल जाहीर झाला.
- त्यात शेख यांच्या राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान या नवोपक्रमाची निवड झाली होती.
- परंतु दरवर्षी होणारा हा पुरस्काराचा सोहळा कोरोनामुळे मागच्या वर्षी साजरा करण्यात आला नव्हता.
- या स्पर्धेसाठी देशातील १६९ शिक्षकांच्या नवोक्रमाची निवड झालेली होती. यात भारतातील ७ राज्यातील शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता.
सर फाउंडेशन आयोजित राष्ट्रीय नवोपक्रम स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला. पुण्यातील लोणावळा येथील सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये हा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात विविध विषयांवर शैक्षणिक विचार मंथन करण्यात आले. मान्यवरांच्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाचे सादरीकरण, पुरस्कार वितरण, पुस्तकाचे प्रकाशन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले.
या पारितोषिक वितरण समारंभास राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त पोलिस व्याख्याने, परिसंवाद, गट चर्चा, महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू, सादरीकरण, पुरस्कार वितरण, शिक्षण तज्ज्ञ डॉ. ह. ना. जगताप, शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
नगरमधील शिक्षक शहाजान शेख यांच्या राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान या उपक्रमाची निवड या नवोपक्रमासाठी करण्यात आली होती. यामध्ये पुरस्कार प्राप्त शिक्षकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. शेख यांच्या उपक्रमाची निवड राष्ट्रीय स्तरावर झालेली असून यापुढे सर फाउंडेशनही पूर्ण भारतात याविषयी जनजागृती करणार आहे, असे आश्वासन सर फाउंडेशनचे सर्वे सर्वा बाळासाहेब वाघ व सिद्धाराम माशाळे यांच्याकडून देण्यात आले. राष्ट्रीय स्तरावरील हा पुरस्कार मिळविण्यासाठी शेख यांना बंधू डॉ. मुक्तार शेख व जहांगीर शेख, पत्नी शबाना शेख यांचे सहकार्य लाभले.
नगरमधील शिक्षकाची ‘तिरंगा सन्मान’मोहीम आहे तरी कशी?
- स्वातंत्र्यदिन किंवा प्रजासत्ताकदिनी अतिउत्साहात तिरंग्याचा अवमान टाळण्यासाठीचा प्रयत्न म्हणजे नगरमधील शिक्षक शहाजान शेख व त्यांच्या सहकाऱ्यांची ‘तिरंगा सन्मान’ मोहीम!
- नगरच्या मुकुंदनगर येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात शहाजान शेख सेवेत आहेत.
- २०१८पासून शेख आणि त्यांचे सहकारी ही मोहीम राबवतात.
- स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनाच्या वेळी आणि वर्षभरही ‘तिरंगा सन्मान’ मोहीम सुरू असते.
- चौकाचौकांमध्ये, रस्त्यांवर पडलेले, अनवधानाने फाटलेले किंवा चुरगळलेले कागदी झेंडे गोळा केले जातात.
- योग्य प्रकारे सन्मानाने ते मार्गी लावण्याचे काम शेख कार्यरत असलेल्या शाळेकडून करण्यात येते.
शिक्षक शहाजान शेख यांचा उद्देश काय?
- देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या तिरंग्याचा सन्मान राखण्यासाठी अशी मोहीम चालवावी लागते.
- ज्या तिरंग्याला घडविण्यासाठी, त्याला उंच करण्यासाठी अगणित स्वातंत्र्यसैनिक, सैन्याच्या जवानांनी स्वत:च्या जिवाचे बलिदान दिले, त्याचा बहुमान राखण्याचा हा प्रयत्न आहे.
- स्वातंत्र्यदिनी जागोजागी तिरंग्याचा सार्वजनिकपणे अपमान होताना दिसतो. गाड्यांवर लावण्यासाठी, मोटारसायकल रॅलीवर मिरविण्यासाठी तिरंगे उत्साहाने घेतले जातात. मात्र, अतिउत्साहात तिरंग्याचा अपमान होत असल्याची जाणीव नसते.
- रस्त्यावर तिरंगा पडलेला दिसला, तरी त्याला उचलण्याची तसदी फारच कमी नागरिक घेतात.
- रस्त्यांवर पडलेल्या कागदी झेंड्यावरून चालताना किंवा वाहन चालविताना थोडीदेखील लाज वाटत नाही, ही शोकांतिका आहे.
- सरकारकडूनही याबाबत कोणतीही यंत्रणा कार्यरत नाही, वाईट वाटते.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात तरी तिरंगा सन्मानाचा विचार व्हावा – शहाजान शेख
यावर्षी आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहोत. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाकडून तिरंगा सन्मान मोहिमेबाबत सकारात्मक विचार केला जाईल अशी अपेक्षा शिक्षक शहाजान शेख यांनी व्यक्त केली. यासाठीच्या मोहिमेत सर्व शासकीय कर्मचारी, शिक्षक, शालेय विद्यार्थी व नागरिक सहभागी झाल्यास तिरंगा सन्मान मोहीम राज्यासाठी व देशासाठी एक नवोपक्रम ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.