मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नाशिकमध्ये २६ ते २८ मार्च दरम्यान नियोजित करण्यात आलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनपुढे ढकलण्याचा निर्णय अखिल भारतीय साहित्य महामंडळाने घेतला आहे. सध्याची परिस्थिती पाहता या काळात संमेलन आयोजित केल्यास विपरीत परिणामी होऊ शकतात. त्यामुळे मार्च ऐवजी मे मध्ये हे संमेलन होणार असल्याची घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी रोजी एका पत्रकान्वये केली.
नाशिक येथे २६ ते २८ मार्च या कालावधी ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. मात्र करोनामुळे हे संमेलन स्थगित करण्यात आलं आहे. राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढतो आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये होणारे साहित्य संमेलन पुढे ढकलावे अथवा ऑनलाईन पद्धतीने घ्यावे अशी मागणी साहित्यिकांमधून व नाशिककरांकडूनही होत होती. या संमेलनासाठीची जवळपास सर्व तयारी झाली होती. अनेक साहित्यिकांना निमंत्रणे पाठवण्यात आली होती.या चर्चेनंतर साहित्य संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात सध्या मुंबई पुणे, ठाणे आणि विदर्भ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करोनाचा प्रसार वाढतो आहे.नाशिकमध्ये सध्या कोरोनाची फारशी चिंता नसली तरीही बाहेरुन येणाऱ्या साहित्यिकांकडून कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता आहे. यासाठी आयोजकांनी सावध भूमिका घेऊन संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
“संमेलनाची जोरदार तयारी आणि निधी संकलन सुरू असताना कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढला आहे. साहित्य महामंडळाने व नाशिकच्या स्वागत मंडळाने कोरोना कमी होण्याची वाट पाहिली. पण, कुठेही कमी होण्याची चिन्ह दिसत नाही आहेत. उलट रुग्णसंख्येत वाढत होत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन अध्यक्ष ठाले यांनी उपाध्याक्षांसह पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. नाशिकमधून येणाऱ्या रसिकांच्या आणि संपूर्ण देशातून येणाऱ्या लेखक-कवींच्या सुरक्षिततेचा विचार करून २६, २७ व २८ मार्च रोजी होणारे साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला,” अशी माहिती मंडळाने दिली आहे.
हा निर्णय घेताना नाशिकचे पालकमंत्री व संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, लोकहितवादी मंडळाचे पदाधिकारी, साहित्य संमेलनाचे पदाधिकारी या सर्वांनी मिळून बैठकीत हा निर्णय घेतला आहे. साहित्य संमेलन पुढे ढकलले असले तरीही संमेलनाचे नियोजन बैठका सुरु राहणार आहे. त्यात कुठलाही खंड पडणार नाही. संमेलनाच्या कार्यालयात विशेष दक्षता घेण्यात येत आहे.