मुक्तपीठ टीम
ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्सच्या (एआयएफटीपी) राष्ट्रीय कार्यकारी समितीवर पुण्यातील वरिष्ठ कर सल्लागार नरेंद्र सोनावणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. ‘एआयएफटीपी’च्या राष्ट्रीय कार्यकारी समितीची निवडणूक नुकतीच पार पडली. २०२२-२४ या दोन वर्षाच्या कालावधीसाठी ही निवड झाली आहे.
सनदी लेखापाल, वकील आणि कर सल्लागार यांचा समावेश असलेली ‘एआयएफटीपी’ ही राष्ट्रीय पातळीवरील संघटना आहे. पूर्ण भारतात कार्यक्षेत्र असलेल्या ‘एआयएफटीपी’चे १०,००० पेक्षा अधिक सदस्य कार्यरत आहेत. नरेंद्र सोनावणे पुणे येथील प्रसिद्ध कर सल्लागार असून, महाराष्ट्र कर सल्लागार संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत. सलग तीन वर्षे पुण्यात आयोजित राष्ट्रीय कर परिषदचे चेअरमन पद त्यांनी यशस्वीरित्या भूषवले आहे.
कर सल्लागार, सनदी लेखापालांच्या विविध अडचणी सोडविणे, तसेच जीएसटी प्रणालीत सुसूत्रता आणण्यासाठी त्यांनी भरीव योगदान दिले आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे पाठपुरावा करत जीएसटी प्रणाली सोपी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. आगामी काळात ‘एआयएफटीपी’च्या माध्यमातून कर प्रणाली अधिकाधिक सुरळीत व्हावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नरेंद्र सोनावणे यांनी सांगितले.