मुक्तपीठ टीम
शेतकरी नेते आणि सरकार यांच्यात पुढील चर्चा शेतकरी २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. २६ जानेवारीनंतर ताणले गेलेले संबंध किमान संवादाइतके निवळले जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी चर्चेची तयारी दर्शविणारे विधान केल्यामुळे शेतकरी नेते चर्चेसाठी पुन्हा तयार झाले आहेत. मात्र, अटक केलेल्या शेतकऱ्यांना सोडण्याची अट त्यांनी टाकली आहे.
मोदींची चर्चेची तयारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सर्वपक्षीय बैठकीत शेतकरी आंदोलनाविषयी भाष्य केले होते. “सरकार चर्चेसाठी सदैव तयार असून कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर शेतकऱ्यांपासून फक्त एक फोन कॉल दूर आहेत”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले होते. त्यामुळे शेतकरी आंदोलक पुन्हा एकदा सरकारशी चर्चेसाठी तयार झाले आहेत.
टिकैत यांचाही सकारात्मक प्रतिसाद
भारतीय किसान युनियनचे प्रमुख नरेश टिकैत यांनी, “सर्वप्रथम सरकारने अटक केलेल्या शेतकऱ्यांना सोडावे आणि चर्चेसाठीसाठी वातावरण तयार करावे”, असे म्हटले आहे. तर पुढे मोदींच्या आवाहनाबद्दल टिकैत म्हणाले की, “आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मान टिकवून ठेवू आणि तिरंग्याचा अपमानही होऊ देणार नाही”.
२ फेब्रुवारीला काय होणार?
शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यातील शेवटची बैठक २२ जानेवारीला झाली होती. या बैठकीत २० जानेवारीच्या बैठकीत दिलेल्या कृषी कायद्यांना दीड वर्षाची स्थगिती आणि किसान हमी दराबद्दल चर्चा करण्यासाठी समिती गठीत करण्याच्या प्रस्तावाबद्दल काही निर्णय झाला की सांगा त्यानंतर चर्चा करणे शक्य होईल, असे सरकारने शेतकरी नेत्यांना सांगितले होते. त्यामुळे या बैठकीतही कोणताच तोडगा निघाला नाही. आता २ फेब्रुवारीला काय होईल त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.