मुक्तपीठ टीम
केंद्रातील भाजपा सरकारने नितिमत्ता धाब्यावर बसवून राज्यकारभार करत आपले भविष्य अंधकारमय केले आहे. देशात फक्त ‘भाजपा’ हा एकच पक्षच ठेवून इतर पक्षांना असंसदीय मार्गाने त्यांना संपवायचे आहे. तसेच मनुवादी राज्य पुन्हा आणायचे आहे. यापासून वाचण्यासाठी खा. राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेत सहभागी व्हा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सर्व पक्ष, संघटनांच्या प्रतिनिधींना केले आहे.
राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो पदयात्रा महाराष्ट्रात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश करित आहे. देशाचा तिरंगा हाती घेऊन ही यात्रा निघाली असून या यात्रेत महाराष्ट्रातील भाजपासोडून इतर सर्व पक्षांनी सहभागी व्हावे, या संदर्भात प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व माजी खासदार हुसेन दलवाई यांनी इस्लाम जिमखाना येथे सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत दलवाई यांनी या बैठकीची संकल्पना उपस्थितांना सांगितली व पक्षभेद विसरून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन भारत जोडो यात्रेत घडवावे अशी विनंती केली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत काँग्रेसचे युसुफभाई अब्राहनी, सीपीआयचे प्रकाश रेड्डी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरज चव्हाण, जनता दलाचे सलीम भाटी, प्रभाकर नारकर, शेकापचे राजू कोरडे, सीपीआयएम चे डॉ. एस. के. रेगे, शैलेंद्र कांबळे, समाजवादी पक्षाचे मिराज सिद्दीकी, काँग्रेसचे प्रा. प्रकाश सोनावणे, प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, मधू मोहिते आदी उपस्थित होते.
लवकरच पुढील बैठक बोलवण्यात येईल व भारत जोडो यात्रेत या पक्षांना आदराने सहभाग घेण्यासंदर्भातील कार्यक्रम जाहीर केला जाईल, असे नाना पटोले यांनी सांगितले.