मुक्तपीठ टीम
राज्यभरातील सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात सुरु असलेल्या कोरोना सहाय्यता मदत केंद्रामार्फेत नागरिकांना मदत केली जात असून त्या कार्याला गती द्यावी. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक लसीसाठी नोंदणी करण्यापासून लस मिळेपर्यंतच्या पूर्ण प्रक्रियेत गावोगावच्या नागरिकांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी पूर्ण मदत करावी असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे नागपूर व अमरावती विभागातील काँग्रेस जिल्हाध्यक्षांची बैठक घेऊन विदर्भातील कोरोना स्थिती, काँग्रेस पक्षाकडून सुरु असलेल्या मदत कार्याचा आणि जिल्ह्यात कोरोना रूग्णांवरील उपचारात येत असलेल्या अडचणींची माहिती घेतली. या बैठकीला राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, अमरावतीच्या पालकमंत्री तथा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, कुणाल पाटील, विकास ठाकरे, सुभाष धोटे, अभिजीत वंजारी, वजाहत मिर्झा, सुलभा खोडके, अमित झनक, यांच्यासह सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद मोरे, डॉ. संजय लाखे पाटील, देवानंद पवार आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. रूग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढते आहे. ऑक्सिजन, वैद्यकीय उपकरणे, रेमडेसिवीर इंजेक्शन औषधे याचा तुटवडा संपूर्ण देशभरात आहे. राज्यही त्याला अपवाद नाही. केंद्र सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून लोकांना मदत मिळवून द्यावी. काँग्रेस पक्षातर्फे राज्यभरात रक्तदान शिबेरे आयोजित केली होती त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. आवश्यकतेनुसार शिबिरांची संख्या वाढवली पाहिजे. गावोगावी जाऊन लसीकरणासाठी लोकांची नोंदणी करून लसीकरण केंद्रावर त्यांना लस मिळेपर्यंतच्या पूर्ण प्रक्रियेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी मदत करावी असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यांनी केले.