मुक्तपीठ टीम
मोदी सरकार मागील ७ वर्षात देश अधोगतीकडे घेऊन गेले आहे. ७० वर्षात काँग्रेसच्या सरकारांनी देशाला विविध योजना व प्रकल्पाच्या माध्यमातून एक समृद्ध राष्ट्र म्हणून उभे केले होते परंतु मोदी सरकारने ७० वर्षातील हे वैभव अवघ्या ७ वर्षात विकण्याचा सपाटा लावला आहे. नोटबंदी, जीएसटीने मोठे नुकसान केले. महागाई, इंधन दरवाढ, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल, डाळी यांच्या महागाईने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना सरकारमधील मंत्री बदलून काही उपयोग होणार नाही. डब्बे बदलण्यापेक्षा देशाला खड्यात घालणारे इंजिनच बदलण्याची वेळ आली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
पुणे येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना नाना पटोले म्हणाले की, मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच सामान्य जनतेला महागाईचे चटके सहन करावे लागत आहेत. या महागाईने सामान्य जनतेबरोबरच मध्यमवर्ग व नोकरदारांचे जगणेही कठीण झाले आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे, लाखो रोजगार गेले. लोकांच्या हातात पैसे नाहीत तर दुसरीकडे महागाईने उच्चांक गाठला आहे. या महागाईविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरून मोदी सरकारचा निषेध करत आहे. १७ तारखेपर्यंत राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरुच राहणार आहे. सामान्य जनतेचा महागाईविरोधातील आवाज दिल्लीच्या सरकारपर्यंत पोहचवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
या पत्रकार परिषदेला कृषी राज्य मंत्री डॉ. विश्वजीत कदम, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी मंत्री रमेश बागवे, किसान काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम पांडे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.
काँग्रेस पक्षाच्या वतीने महागाई व इंधन दरवाढीविरोधात १० दिवसांचे आंदोलन सुरु असून आज महिला काँग्रेसने राज्यभर चुल मांडून आंदोलन केले. नागपूर येथे महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले तर अमरावती येथे महिला व बाल कल्याण मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. पुण्यातील महिला आंदोलनात राज्यमंत्री विश्वजित कदम यांनीही सहभाग घेतला. कोल्हापूर, सांगलीसह राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयी महिला काँग्रेसने आंदोलन केले.