मुक्तपीठ टीम
महाड पोलादपूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांच्या अकाली निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. जगताप यांच्या निधनाने उत्तम सहकारी व मित्र गमावला, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.
कोरोनाने अनेक निकटवर्तीयांना आपल्यापासून हिरावून घेतले आहे. माणिकराव कोरोनावर मात करून पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतील असे वाटत असतानाच त्यांचा निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. हे त्यांचे जाण्याचे वय नव्हते. माणिकराव हे उत्तम वक्ते, कुशल संघटक होते. ते सर्वांना बरोबर घेऊन काम करत, लोकांचे प्रश्न हिरीरीने मांडत. कोकणात काँग्रेस पक्षाचे संघटना बळकट करण्याचे काम त्यांनी केले.
विद्यार्थी असताना एनएसयुआयमधून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली, त्यानंतर युवक काँग्रेसमध्ये त्यांनी काम केले. २००४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी महाड मतदार संघातून विजय संपादन केला होता. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर होती. रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटनेला बळ देण्याचे काम त्यांनी केले. पक्षाने त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली.
जगताप यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचे व वयैक्तिक माझी मोठी हानी झाली आहे. हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना मिळो. माणिकराव जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी जगताप कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.