मुक्तपीठ टीम
जनता सध्या भाजपा सरकारला कंटाळलेली असून जनमत काँग्रेस विचाराकडे मोठ्या संख्येने आकर्षित होत आहे. काँग्रेस हाच भाजपाला पर्याय असून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी बुथ स्तरावर काम करा आणि गावखेड्यात काँग्रेसचा विचार पोहचवा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली गांधी भवन येथे पार पडली. या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील, आ. शिरीष चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष भाई नगराळे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, प्रदेश सरचिटणीस प्रकाश सोनावणे, देवानंद पवार, प्रमोद मोरे, जिल्हाध्यक्ष संदिप भैय्या पाटील आदी उपस्थित होते.
पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पटोले म्हणाले की, काँग्रेस विचाराचे सरकार येण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन एकदिलाने काम केले पाहिजे. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी तरुण वर्गापर्यंत काँग्रेसचा विचार पोहचवला पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन जाणारा काँग्रेस पक्ष असून जळगाव जिल्हा व उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस संघटना मजबूत करून पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी काम करा, असे पटोले म्हणाले.