मुक्तपीठ टीम
धारावी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा भ्रष्टाचार केला आहे. पुनर्वसन प्रकल्पासाठीच्या ४५ एकर जमिनीसाठी फडणवीस सरकारने रेल्वेला ८०० कोटी दिले परंतु आजपर्यंत ती जमीन राज्य सरकाला मिळालेली नाही आणि ८०० कोटी रुपयेही परत मिळाले नाहीत. ही जनतेच्या पैशाची लूट असून या घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, धारावीतील लोकांना चांगली घरे मिळावीत, धारावीचा कायापालट व्हावा, मुंबई स्वच्छ व सुंदर व्हावी यासाठी विलासराव देशमुख यांचे सरकार असताना धारावीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी पुनर्वसन प्रकल्पाची योजना मांडली होती परंतु काहीकारणाने ती कार्यान्वित होऊ शकली नाही. ही योजना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने सुरु केली. याकामी फडणवीस सरकारने ८०० कोटी रुपये रेल्वेला जमिनीसाठी दिले पण आजपर्यंत त्या योजनेचे काम पुढे गेले नाही. जमीनही मिळाली नाही आणि पैसेही परत आलेले नाहीत. ह्या पैशाचे काय झाले? योजना का फसली? जनतेचे पैसे रेल्वेला दान करण्याचा अधिकार फडणवीस यांना कोणी दिला ? याची चौकशी एसआयटीचे गठन करून त्यामार्फत करावी, हवे तर ईडी व सीबीआय चौकशीसाठी शिफारस करावी अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे. आम्ही हा प्रश्न अधिवेशनातही उपस्थित करणार आहोत.
रश्मी शुक्लांवर ५०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकणार..
पुणे पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असताना रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे माझे फोन टॅपिंग केले. अमली पदार्थांच्या व्यापाराशी माझा संबंध लावून अमजद खान असे मुस्लीम नाव ठेवून फोन टॅप करण्यात आले, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यावेळी मुख्यमंत्री व गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस होते, त्यांचा सहभाग यामध्ये असेल तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. सध्या मुख्य आरोपी रश्मी शुक्ला आहेत असे समोर आले आहे. माझा फोन टॅपिंग झाल्याचा आरोप मी केला होता. विधानसभेतही हा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकरणी रश्मी शुक्ला आणि संबंधित व्यक्तींवर ५०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकणार आहे.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले हे आमचे दैवत आहेत. आमच्या या दैवतांचा भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सातत्याने अवमान करत असतात. कर्नाटकातील भाजपा सरकारही छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करत आहे. भाजपाची ही विकृत्ती महाराष्ट्राच्या जनतेला आवडणारी नाही. आजही पुण्यातील दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणाऱ्या पगडीवर छत्रपत्री शिवाजी महाराजांची राजमुद्रा लावण्यात आली होती. काँग्रेसने त्याला आक्षेप घेतल्यावर ती राजमुद्रा काढण्यात आली. नरेंद्र मोदी हे आमच्या महापुरुषांपेक्षा मोठे आहेत हे भाजपा दाखवण्याचा प्रयत्न करत असते परंतु मोदी हे शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्यासारख्या महापुरुषांपेक्षा मोठे नाहीत हे महाराष्ट्राच्या जनतेने ठणकावून सांगितले आहे तरीही जाणीवपूर्वक भाजपाकडून त्याची पुनरावृत्ती केली जात आहे.
ओबीसी आरक्षणाच्या बाबतीतही भाजपाकडून अडवणुकीची भूमिका घेतली गेली आहे. आरक्षण संपवायचे हा त्यांचा डाव आहे. म्हणूनच ९८ टक्के अचुक असलेल्या डेटा केंद्र सरकार राज्य सरकारला देत नाही. ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा एकट्या महाराष्ट्रात नाही तर मध्य प्रदेशातही आहे, तेथे भाजपाचे सरकार आहे मग तिथे भाजपमुळेच आरक्षण गेले असे भाजवाल्यांचे म्हणणे आहे का ? परंतु मंडल आयोगाला विरोध करत कमंडल कोणी आणले हे जगाला माहित आहे. भाजपा मंडल आयोगाच्या शिफारशीच संपवायला निघाले आहे. पण हा डाव आम्ही हाणून पाडू..