तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
भाजपाच्या साडेतीन नेत्यांना उघडं पाडणार, अशी संजय राऊत यांनी घोषणा केली. काही दिवस महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघालं. मंगळवार सकाळपासून राऊत उघडं पाडणार ते साडेतीन नेते कोण? त्याचीही चर्चा सुरु झाली. त्यातही पुन्हा राऊतांनी ज्याला अर्धा नेता म्हटलं तो भाजपा नेता कोण, अशीही चावडीवरच्या गप्पांसारखी खमंग चर्चा रंगली.
एखादा मोठा चित्रपट येण्यापूर्वी खूप प्रमोशन केलं जातं. प्रोमो चालतात. नंतर अनेकदा प्रत्यक्षात चित्रपट प्रदर्शित झाल्यावर कळतं, चित्रपट तसा नाही जसा प्रोमो होता. राऊतांच्या साडेतीन भाजपा नेत्यांबद्दलच्या प्रस्तावित आरोपांबद्दल तसंच झालं आहे. हिट प्रोमोनंतर आक्रमक डायलॉगबाजीचा चित्रपटानं लोकांचा अपेक्षाभंग झाल्यानंतर निर्मात्यानं आता आम्ही सिक्वेल काढणार आहोत. पुढच्या भागात तेही असेल, जे प्रोमोत सांगितले, तर प्रेक्षकांचा जसा रसभंग होतो, तसंच राऊतांच्या आजच्या आक्रमक पण विना साडेतीन नेत्यांच्या पत्रकार परिषदेनं झालं आहे.
शिवसेना नेते संजय राऊत खूप आक्रमक झाले, पण भाजपाच्या साडेतीन नेत्यांची नावं उघड न करता उठले! त्यांची आक्रमकता एवढी जास्त होती की त्यांनी काही नको ते शब्दही वापरले. आधी म्हणाले ती भाजपा नेत्यांची नावे नंतर जाहीर करू म्हणाले! पण अपेक्षा ही नव्हती, हे कुणीही सांगेल. त्यानंतर ते शिवसेनाभवनातून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा या सरकारी निवासस्थानाकडे रवाना झाले.
संजय राऊत खूप आक्रमक बोलले. पण ते रोज सकाळी साडेनऊला बोलतात, तेही आक्रमकच असतं. आज जास्त आक्रमक होतं. एवढंच. पुन्हा जेव्हा तुम्ही त्या साडेतीन भाजपा नेत्यांना थेट अनिल देशमुखांच्या कोठडीतच टाकण्याची घोषणा केली होती. त्यामुळे अशा तुम्ही म्हणालात तशा खतरनाक नेत्यांना मोकळं ठेवणंही खतरनाकच!
अर्थात फक्त शिवसेना नेते संजय राऊतच तसे वागले असे नाही. भाजपाने संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेपूर्वी भाजपा नेते सुधिर मुनगंटीवार यांच्या पत्रकार परिषदेची घोषणा केली होती. पण ऐनवेळी ती पत्रकार परिषदही न सांगता रद्द केली. भाजपाने सुधीर मुनगंटीवारांची पत्रकार परिषद जाहीर केली. पण तीही रद्द झाली. त्यांनी बाइट दिला हे पीसी रद्द करण्याचे कारण असू शकत नाही. मोहित कंबोज बोलले. तेही तसे खूप महत्वाचे नेते. राऊत म्हणाले तसे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे जवळचेही. पण त्यांना भाजपाचं अधिकृत प्रत्युत्तर म्हणता येत नाही. ते जे बोलतात, ती जर भाजपाची अधिकृत भूमिका मांडली तर मग सोशल मीडियातील प्रत्येक ट्रोलरला त्या त्या पक्षांचे अधिकृत प्रवक्ते मानायला हरकत नसावी.
त्यामुळे मित्रांनो तुम्हाला हेच सांगायचं आहे. फार कुणाच्या प्रेमात पडू नका. तुम्हीच धक्क्यांनी पडाल. आजच्या या घटनाक्रमात तुम्हाला मला जे दिसले ते पडद्याच्या समोरील. खरं राजकारण तर पडद्यामागेच जास्त चालतं.
या दोन पक्षांचं हे असं नाट्य सुरु असतानाच तिथं ईडीच्या धाडसत्रांच्या बातम्याही सुरु आहेत. त्यांचा संबंधही जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. पण जोपर्यंत पुढे संजय राऊत साडेतीन नेत्यांबद्दल पुढे काय बोलतात आणि भाजपा किंवा ईडी काय करते त्यावरून वास्तव कळेल. किंवा नेहमीप्रमाणे साडेतीन नेत्यांचं गूढ तर उकललंच नाही तर रहस्य वेगळंच वाढलं की शिवसेना भाजपात पडद्यामागे नेमकं काय घडलं. त्यात ईडीच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आघाडीतील आणखी कोणी काही वेगळी भूमिका निभावली का? थोडक्यात गूढ तसंच राहिलं रहस्य मात्र वाढलं!
तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या स्वतंत्र मुक्त माध्यमाचे संपादक आहेत.
संपर्क ९८३३७९४९६१ ट्विटर @TulsidasBhoite @Muktpeeth