मुक्तपीठ टीम
गरीबांच्या घरी चुल तेव्हाच पेटते, जेव्हा हातावरच्या व्यावसायाला बरकत येते. जर हातावरचा धंदाच बुडाला तर लाखो वेळा उपाशी राहवे लागते. सकाळी उठून पुन्हा एकदा अंगातील त्राण एकवटून बाजारात व्यावसायाची ‘सरस्वती’ मांडावी लागते. त्या रंजलेल्या-गांजलेल्या छोट्या व्यावसायिकांना हक्काच्या ओट्याची जागा मिळावी म्हणून गेले चार वर्ष पनवेल संघर्ष समिती प्रयत्न करीत आहे. त्याला अखेर यश आल्याची कबुली देत आयुक्त गणेश देशमुख यांनी महापालिकेतील पाच शहरांसाठी ५७ रोज बाजारांचा आराखडा तयार केला असल्याची आणि त्याला मान्यताही दिल्याचे सांगून कांतीलाल कडू यांच्या यशस्वी प्रयत्नांवर शिक्कामोर्तब केले.
आज नियोजित भेटीनुसार महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांची त्यांच्या दालनात खांदा कॉलनी येथील भाजी विक्रेत्यांच्या शिष्टमंडळासह पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी भेट घेवून सविस्तर चर्चा केली. यावेळी बैठकीला महापालिकेचे मुख्य शहर अभियंता संजय कटेकर, अधिकारी जयराम पादिर आणि छोट्या भाजीपाला व्यावसायिकांचे नेते जयंत भगत, रमाकांत पाटील, बाबू मिसाळ, संतोष गोस्वामी, विनोद वर्मा, विठाबाई पाटील, संगिता डोईफोडे, मंजुळा भगत, छाया बांदल, मिना मोर्या, सिंधू आंकारले, गायत्री मुंडे, वैशाली माने, प्रकाश शैजवल, सुरज गॉड, आनंद थोरवतकर, स्वप्नाली बेहरे उपस्थित होते.
शहराच्या काही महत्वाच्या गरजांमध्ये भाजीपाला विक्रेत्यांसह छोट्या व्यावसायिकांच्या व्यावसायाला राष्ट्रीय फेरिवाला योजना आणि इतर लघु-उद्योग व्यवसाय मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार त्यांची व्यवस्था करणे गरजेचे आहे. परंतु, महापालिकेतील सत्ताधारी भाजप, विरोधी पक्षातील शेकाप, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या नगरसेवकांनीही मौन बाळगल्याने व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहावर बंधने येत गेली. त्यात सिडकोच्या अतिक्रमण पथकाची टांगती तलवार असल्याने कारवाईच्या प्रसंगी पदरात बांधलेल्या कोवळ्या चिल्यापिल्यांसह पळ काढण्याच्या अनेक बाका प्रसंगांना त्यांना सामोरे जावे लागत होते.
त्यांची ही व्यथा लक्षात घेवून सर्वच शहरातील भाजी मार्केट, रोज बाजारचे सुशोभिकरण आणि नियोजनबद्ध कृती आराखड्यानुसार ओटे बांधून ते व्यापारी तत्वावर सर्व सोयी सुविधांसह व्यावसायिकांच्या स्वाधीन करावे, अशा आशयाच्या मागणीसह तत्कालीन प्रशासक व आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, राजेंद्र निंबाळकर, गणेश देशमुख, सुधाकर देशमुख आदींकडे वारंवार पत्रव्यवहार करून पाठपुरावा सुरू ठेवला होता.
पनवेल संघर्ष समिती व अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या मागणीनुसार आयुक्त गणेश देशमुख यांनी पनवेल शहरासाठी ५, नवीन पनवेल आणि खांदा कॉलनीकरीता १०, कामोठे ६, खारघर १७ आणि कळंबोली १९ ठिकाणी रोज बाजार स्थापन करण्यात येतील, अशी माहिती देशमुख यांनी कडू यांना दिली. यामध्ये हे सर्व भुखंड सिडकोकडून लवकरच हस्तांतरित करून घेण्यात येतील. काही प्रमाणात भुखंड हस्तांतरणाचे काम पूर्ण झाले आहे, इतरसाठी प्रयत्न सुरू आहेत. छोट्या व्यावसायिकांचे सर्वेक्षण सुरू असून महापालिकेच्या नियमांच्या अधिन राहून व्यावसायिकांना ओटे बांधून दिले जातील. येत्या वर्षभरात ५७ रोज बाजारचे लोकार्पण करण्याचा शब्द देशमुख यांनी कडू यांना दिल्याने महापालिकेत सत्ता कुणाचीही असो अथवा विरोधक कुणीही असोत ‘बाप बाप’ होता है, हे पुन्हा एकदा कांतीलाल कडू यांनी दाखवून दिल्याने गरीबांच्या नावाने अश्रू ढालून त्यांचे रक्त शोषण करणारे सर्वपक्षिय नेते ऐन निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर उघडे पडले आहेत.