मुक्तपीठ टीम
मुंबईतील एका स्टार्ट अपने अवघ्या शंभर रुपयात कोरोनाचे निदान करणारे किफायतशीर रॅपिड अँटिजेन चाचणी किट तयार केले आहे. हे किट पतंजली फार्मा या कंपनीने विकसित केले आहे. ते प्रमाणित RTPCR आणि रॅपिड अँटिजेन चाचणीला पूरक असेल. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व चाचणी किटपैकी ते सर्वात स्वस्त आहे.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने कवच उपक्रमाच्या अंतर्गत जुलै २०२० मध्ये रॅपिड कोरोना निदानासाठी रॅपिड अँटिबॉडी आणि अँटिजेन चाचणी किट विकसित करण्यासाठी पाठबळ दिले आहे. त्या अंतर्गतच हे किट तयार करण्यात आले आहे.
पतंजली फार्मा कंपनीचे संचालक डॉ.विनय सैनी यांनी मुंबईच्या आयआयटीत या स्टार्ट-अपच्या माध्यमातून संशोधनाचे काम सुरु केले. अवघ्या ८-९ महिन्यात संशोधन आणि विकास प्रयोगशाळेची उभारणी केली. तसेच उत्पादनांची निर्मिती केली. ही उत्पादने तपासण्यासाठी आणि त्यांच्या दर्जात आणखी सुधारणा करण्यासाठी विविध कोरोना केंद्रांवर पाठवून त्यांचे परीक्षण तसेच प्रमाणीकरण करण्यात आले आणि आवश्यक परवानग्या मिळवण्यात आल्या.
“कोरोना रुग्णांच्या नाकातील आणि घशातील स्त्रावांचे नमुने असलेल्या विषाणू वाहक माध्यमात आणि रुग्णांसाठी आमची उत्पादने वापरून प्रमाणीकरण करण्याचा अनुभव अत्यंत आश्चर्यकारक होता. माझ्या पथकातील सहकाऱ्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी मुंबईत विविध कोरोना केंद्रांवर आम्ही विकसित केलेल्या उत्पादनांच्या अनेक मूल्यांकनाच्या वेळी मी उपस्थित राहिलो,” असे या उत्पादनांच्या विकासाच्या प्रवासाचे वर्णन करताना डॉ सैनी यांनी सांगितले.
जून २०२१ च्या सुरवातीला या रॅपिड कोरोन अँटिजेन चाचणीला सुरुवात करण्याचे नियोजन स्टार्टअपने केले आहे. सुमारे १० ते १५ मिनिटांत होणारी ही चाचणी पॅथॉलॉजी तसेच चाचणी प्रयोगशाळांची कमतरता असलेला ग्रामीण भाग, डॉक्टरांचे दवाखाने तसेच मर्यादित साधने असलेल्या भागांमध्ये कोरोना निदानासाठी उपयुक्त ठरणार आहे. ही चाचणी किफायतशीर दारात होणार असून त्यामुळे महामारीला आळा घालण्यासाठी मदत होणार आहे.
सध्या ते DST SEED अनुदान आणि BRICS देश, CRISPR आधारित कोरोना चाचणी अमेरिकेतील फ्लोरिडा विद्यापीठाच्या IUSSTF अंतर्गत कोरोना प्रेरक अनुदान, भारत-अमेरिका प्रकल्प यांच्या माध्यमातून रॅपिड कोरोना अँटिबॉडी चाचणी तसेच रॅपिड टीबी चाचणी यांच्यावर काम करीत आहेत.
पाहा व्हिडीओ: