मुक्तपीठ टीम
मध्य रेल्वेने आता एसी लोकल संबंधित ई-सर्वेक्षण फॉर्म मोहीम सुरु केली आहे. त्याअंतर्गत एसी लोकलचे प्रवासी वाढवण्यासाठी थेट जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे. गेल्या वर्षी मध्य रेल्वेवर पहिली एसी लोकल ट्रान्सहार्बर मार्गावर आणि दुसरी मुख्य मार्गवर धावायला सुरुवात झाली होती. मात्र, या दोन्ही लोकलला अत्यंत कमी प्रतिसाद मिळत असल्याने रेल्वे प्रशासनाने सर्वेक्षणाच्या माध्यमातून हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र रेल्वे प्रवासी संघटनेकडून यावर आक्षेप नोंदवला गेला आहे. प्रवासी संघटनेकडून सतत सूचना देऊन सुद्धा यांची दखल रेल्वेकडून घेतली जात नाही. फक्त सर्वेक्षणाचा नावावर मुंबईकरांची दिशाभूल करण्याचे काम रेल्वेकडून केले जात असल्याचा घणाघाती आरोप रेल्वे प्रवासी परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी केला आहे.
काय म्हणतात सुभाष गुप्ता?
- मध्य रेल्वेच्या ताफ्यात गेल्या वर्षी एसी लोकल दाखल झाली होती.
- त्यावेळी मध्य रेल्वेच्या विभागीय कार्यालयात सर्व प्रवासी संघटनेची बैठक बोलावण्यात आली होती.
- या बैठकीत सर्व प्रवासी संघटनांनी एकमताने रेल्वेला निवेदन देऊन एसी लोकलचं स्वागत केलं होतं.
- मात्र त्याचवेळी सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करु नका, अशी विनंती केली होती.
- तसंच १२ डब्यांच्या सामान्य लोकलला ३ डबे एसी लोकलचे जोडण्याच्या सूचना केल्या होत्या.
- एसी लोकलचे भाडे सर्वसामान्यांना परवडेल असे ठेवण्याची सूचनाही त्यात होती.
- त्यानंतरही रेल्वेने एसी लोकलबाबत प्रवाशांची मते जाणून घेण्यासाठी गेल्या वर्षी प्रवासी सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला.
- सर्वेक्षणानंतर रेल्वेकडून काहीच बदल केलेला नाही.
- फक्त सर्वेक्षणाच्या नावावर मुंबईकरांची दिशाभूल करण्याचे काम रेल्वेकडून केले जात आहे.
एसी लोकलला अल्प प्रतिसाद
- पश्चिम रेल्वेनंतर मध्य रेल्वेने ३० जानेवारी २०२० पासून ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते पनवेल दरम्यान एसी लोकल चालवायला सुरुवात केली होती.
- त्यानंतर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर १७ डिसेंबर २०२० पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण मार्गावर दुसरी एसी लोकल धावली.
- एसी लोकलसाठी मध्य रेल्वेने सामान्य लोकलच्या काही फेऱ्या रद्द केल्या.
- त्याऐवजी एसी लोकल चालवल्या गेल्या.
- एसी लोकलचे दर परवडणारे नसल्याने लोकांनी सामान्य लोकलने प्रवासावरच भर दिला.
- परिणामी, सामान्य लोकलमधली गर्दी वाढली.
एसी लोकलचे गेल्या वर्षीही सर्वेक्षण
- एसी लोकलला मिळत असलेल्या अल्प प्रतिसादानंतर सर्वेक्षण केलं गेलं.
- त्यानुसार ऑफ लाईन आणि ऑनलाईन सर्वेक्षण करण्यात आलं.
- प्रवाशांच्या अडचणी मांडण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून क्षेत्रीय आणि विभागीय स्तरावर प्रतिनिधींची नेमणूक केली होती.
- तरीही प्रवाशांची संख्या वाढली नाही. नंतर कोरोनामुळे लोकल बंद करण्यात आली.
- आता मरेने दुसऱ्यांदा ऑनलाईन सर्वेक्षण सुरु केलं आहे.
- या सर्वेक्षणात २० प्रश्नांचा समावेश आहे.
- या सर्वेक्षणात होय किंवा नाही आणि कोणत्या मार्गाने प्रवास करता, अशी माहिती भरायची आहे.