प्रा. मुकुंद आंधळकर
पेन्शन धारकांना दरवर्षी १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत हयातीचा दाखला आपापल्या बॅंकेच्या शाखेत जमा करावा लागतो, तेथे असलेल्या पेन्शन रजिस्टर मध्ये सही करावी लागते अन्यथा त्यांचे पेन्शन काढले जात नाही. यावर्षी मुंबईतील कित्येक बॅंकेत पेन्शन रजिस्टर आले नसल्याचे सांगितले जात आहे.
मुंबईतील युनियन बँकेच्या घाटकोपर व मुलुंड शाखेत पेन्शन रजिस्टर आले नसल्यामुळे शिक्षकांना परत पाठवले आहे. तशीच अवस्था स्टेट बॅंकेची आहे. मुंबई सेंट्रल येथील तसेच मीरा रोड येथील शाखेतही शिक्षकांना रजिस्टर नसल्याचे सांगितले व पेन्शन धारकांना परत पाठवले आहे रजिस्टरसाठी १५ तारखेनंतर चौकशी करण्यासाठी सांगितले आहे. सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांना त्यामुळे वारंवार बॅंकेत चौकशी साठी जावे लागत आहे.
अलीकडे शासनाने निवृत्तीधारकांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्राची सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी घरोघरी बायोमेट्रिक मशीनची सुविधा नसल्यामुळे पेन्शनधारकांना आपले हयातीचे प्रमाणपत्र सादर करता येत नाही त्यामुळे बहुतेक सेवानिवृत्त आपापल्या बँकेत जाऊन पेन्शन रजिस्टरवर सही करण्यास प्राधान्य देतात. आजपर्यंत अशा प्रकारे सेवा निवृत्ती धारकांना परत पाठवले जात नव्हते परंतु यावर्षी बँकेमध्ये पेन्शन रजिस्टर आले नसल्यामुळे सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांना परत पाठवले जात आहे याचा मुंबई कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेने तीव्र निषेध केला आहे.
मुंबई सेंट्रल येथील स्टेट बँकेच्या शाखेत महाराष्ट्र कॉलेजमधील सेवानिवृत्त शिक्षक देवनाथ घुगे यांना 15 नोव्हेंबर नंतर देण्यास सांगितले असून पेंशन धारकांसाठी 30 डिसेंबर पर्यंत मुदत वाढवली आहे असे सांगण्यात आले, तर मीरा रोड येथील स्टेट बँकेच्या शाखेत प्राध्यापक कय्यूम खान यांनासुद्धा पेन्शन रजिस्टर आम्हाला अजून प्राप्त झाले नसून ते 15 नोव्हेंबर नंतर उपलब्ध होईल असे सांगण्यात आले.
संघटनेने मुंबईच्या पे ॲन्ड अकाउंट डिपार्टमेंटला संपर्क केल्यावर पेन्शन रजिस्टर सर्वांना उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे सांगितले. येत्या १५ तारखेपर्यंत सर्वत्र पेन्शन रजिस्टर उपलब्ध न झाल्यास संघटनेमार्फत तीव्र आंदोलन हाती घेण्यात येईल.
प्रा मुकुंद आंधळकर हे मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे सरचिटणीस आहेत.